Mumbai Traffic Police : आरोग्याची समस्या असलेले 55 वर्षांवरील मुंबईतील वाहतूक हवालदार दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत रस्त्यावरुन ऑफ ड्युटी
Mumbai Traffic Police : 55 वर्षांहून जास्त वयामध्ये आरोग्याच्या समस्या असलेले मुंबईतील वाहतूक पोलीस हवालदार दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत रस्त्यावरुन ऑफ ड्युटी राहणार आहेत. मुंबई वाहतूक विभागाकडून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Mumbai Traffic Police : मुंबईतील तापमानाचा पारा (Mumbai Temperature) वाढलेला आहे. अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे आवश्यक असेल तर घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जात आहे. अशावेळी शहरातील वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांबाबतही (Traffic Police) मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 55 वर्षांहून जास्त वयामध्ये आरोग्याच्या समस्या असलेले मुंबईतील वाहतूक पोलीस हवालदार दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत रस्त्यावरुन ऑफ ड्युटी राहणार आहेत. मुंबई वाहतूक विभागाकडून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यांच्या जागी कर्तव्याकरता तरुण आणि सशक्त अंमलदारांची नेमणूक केली जाईल, असंही आदेशात नमूद केलं आहे.
शहरातील वाढती उष्मा पाहून मुंबई वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर वाहतूक व्यवस्थापित करणाऱ्या पोलीस हवालदार आणि अधिकाऱ्यांसाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघरमधील दुर्घटनेत 15 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता, त्यामुळे भर उन्हात रस्त्यावर उभं राहून वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत खबरदारी घेण्यास दलाने सुरुवात केली आहे. मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी जारी केलेल्या पत्राची ऑर्डर प्रत एबीपी माझाकडे आहे. ज्यात सर्व वाहतूक उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि मुंबईतील सर्व वाहतूक युनिटच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आदेशांचे पालन करण्यास सांगितलं आहे.
ऑर्डर कॉपीमध्ये काय म्हटलं आहे?
राज्यात काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे, वाहतूक पोलिसांना वर्षभर रस्त्यावर उभे राहून आणि उन्हामध्ये कर्तव्य बजवावे लागते. अधिकारी व अंमलदार यांना उष्माघात होऊ नये याकरता आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
- वाहतूक विभागातील ज्या अंमलदारांचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना बीपी, शुगर, दमा, दुर्धर आजार, मोठे ऑपरेशन झाले आहे अशा अंमलदारांची दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत रस्त्यावरील कर्तव्याकरता नेमणूक करण्यात येऊ नये.
- कर्तव्याकरता तरुण आणि सशक्त अंमलदारांची नेमणूक करावी. कर्तव्य वाटप करताना जोडीने नेमणूक करावी. आवश्यक त्या ठिकाणी अंमलदारासोबत वॉर्डनची नेमणूक करावी.
- कर्तव्यावरील अधिकारी आणि अंमलदार यांच्याकरता स्वच्छ आणि शुद्ध पेयजल बॉटलची व्यवस्था त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजता करण्यात यावी.
- तापमानाची दाहकता लक्षात घेता सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी न चुकता डोक्यावर टोपी परिधान करावी.
- कर्तव्यावरील अधिकारी/अंमलदार यांना अचानकपणे छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयक समस्या झाल्यास त्यांना तात्काळ कुटुंब आरोग्य योजना कार्यान्वित असलेल्या जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.
- सर्व व.पो. नि. व.प्र.पो. नि. यांनी जातीने लक्ष देऊन उष्माघात होणार नाही याकरता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.