10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून 1 हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
Omicron variant Mumbai on Alert : 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून 1 हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती.
Aaditya Thackeray : दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सुरु असून 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून 1 हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अशी माहिती दिली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण आणि बीएमसीच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासोबत आदित्य ठाकरेंची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सुरु असून 10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून 1 हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. या सर्वांना ट्रेस केलं जात आहे. जे मुंबईत आहेत, त्यांची माहिती घेतली जात आहे. मुंबईच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलाय, कोविड सेंटरची तयारी करण्यास सांगितलं आहे. 102 टक्के लसीकरण पहिला डोस पूर्ण, 72 टक्के दुसरा डोस पूर्ण झाले आहेत. लसिकरणाच्या वेगासाठी दोन डोसमधील अंतर कमी करणं गरजेचं आहे, तशी विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे." पुढे आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीनुसार, "दोन-तीन देश आज लॉकडाऊनमध्ये आहेत. पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाहीय. पण काळजी घेणं गरजेचं आहे. शाळा आपण सुरु करत आहोत. पण काळजी घेणं गरजेचं आहे."
ओमिक्रॉनचा धोका, मुंबईत अलर्ट; व्हायरसला रोखण्यासाठी महापालिका सज्ज
कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग मुंबईत फैलावू नये, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार काही नियम तयार करण्यात आल्या असून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
विमान प्रवासासाठी तिकिट बुक करताना विमान कंपन्याना हमी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घ्यावी अशी प्रशासनाने सूचना केली आहे. मागील 15 दिवसांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार आहे. विलगीकरणासाठी 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार हॉटेल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थात्मक विलगीकरणाच्या कालावधीनंतरही 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेचे रिचर्डसन अॅन्ड क्रुडास कोविड सेंटर हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता राखीव असणार आहे.
नव्या स्ट्रेनवर लक्ष, 50 हजार कोविड चाचणी
परदेश प्रवास करुन आलेल्या प्रत्येक पॉझिटीव्ह रुग्णाचे कस्तुरबा प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेंसींग टेस्ट केली जाणार आहे. दररोज 50 हजार कोविड चाचणी केल्या जाणार आहेत. प्रत्येक कोविड केंद्राचे ऑडिट करण्यात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून काही यंत्रणांचा वापर झाला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांची तपासणी करण्यात येणार आहे. ऑक्सिजन साठा, औषध पुरवठा यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.