नाताळ, नवीन वर्षाच्या मोठ्या सेलिब्रेशनवर ओमायक्रॉनचे सावट; कठोर निर्बंध लागू होणार?
Omicron Thread : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांवर ओमायक्रॉनचे सावट आहे.
New Year Celebration and Coronavirus : कोरोना व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका असताना मुंबईत आतापासूनच वर्षअखेरच्या पार्ट्यांची रेलचेल सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी कठोरपणे होणार असल्याची चिन्हं आहेत. मुंबईत मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी तसे संकेतही दिले आहे.
कोरोनाबाबत असलेली एसओपी कठोर करण्यात आली आहे. सरकारकडून मोठ्या पार्ट्यांना परवानगी मिळेल असे वाटत नसल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले. प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत याआधीच परवानगी देण्यात आली आहे. प्रार्थनास्थळांमध्येदेखील कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुंबई महापालिकाही सज्ज
गर्दीमुळे होणाऱ्या रुग्णवाढीचा धोका टाळण्यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डात 2 ते 5 भरारी पथके नेमून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नियुक्ती करण्यात येणाऱ्या 100 पथकांच्या माध्यमातून कोरोना खबरदारीचे नियम मोडल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांच्या सहाय्याने कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी अजूनही दररोज सुमारे 150 ते 250 पर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. असे असताना दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये आलेल्या कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोनचाही धोका असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. असे असताना अनेक ठिकाणी आयोजित कार्यक्रम, पाटर्य़ांमध्ये कोरोना खबरदारीचे नियम मोडले जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, नियम मोडणाऱ्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींचाही समावेश असल्याचे समोर आल्याने पालिकेने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोख दंड , कारवाई होणार
कोरोना नियंत्रणात आल्यामुळे सद्यस्थितीत हॉलमधील कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीत तर मोकळय़ा जागेतील कार्यक्रमांना 25 टक्के उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे. मात्र हे नियम सर्रासपणे मोडले असल्याचे निदर्शनास येत आहे.
50 टक्के उपस्थितीच्या जागी 200 टक्के उपस्थिती असून प्रचंड गर्दीही होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल, रेस्टॉरंट, हॉल, पब, पाटर्य़ांच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी पोलिसांसह सरप्राइज व्हिजिट करणार आहे. यावेळी मास्क घातलेले नसल्यास, गर्दी आढळल्यास रोख दंड पिंवा साथरोग कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.