(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्यावर कारवाईला ठेकेदार मिळत नसल्याने तूर्तास कारवाई नाही, बीएमसीचं लोकायुक्तांच्या सुनावणीत स्पष्टीकरण
रस्ते रुंदीकरणासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत मोठी अडसर ठरत असल्याचं समोर आलं आहे. पण अद्याप मुंबई महापालिकेकडून याबाबत ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मुंबईत असलेल्या जुहू चौपाटी परिसरामधील प्रतीक्षा बंगल्याची (Pratiksha Bungalow) भिंत मागील काही वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. रस्ते रुंदीकरणासाठी बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत मोठी अडसर ठरत असल्याचे समोर आले होते. ज्यानंतर लोकायुक्तांनी याबाबत मुंबई महापालिकेला स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर पालिकेने प्रतीक्षा बंगल्यावर तूर्तास कारवाई करणार नाही असं स्पष्टीकरण लोकायुक्तांच्या सुनावणीत दिली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदार मिळत नसल्याने प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. तसंच पुढील आर्थिक वर्षात कंपाउंड वॉल पाडून पुढची कार्यवाही करु असं पालिकेनं म्हटलं आहे.
या सर्व प्रकरणाबाबत काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. पालिका 2017 पासून रस्ता रुंदीकरणासाठी बच्चन यांच्याकडून जमीन ताब्यात घेण्यात अपयशी ठरल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं. दरम्यान या सर्व प्रकरणामुळे मुंबई महापालिका एकीकडे सर्वसामान्यांवर थेट कारवाई करते, मात्र दुसरीकडे अभिनेते बच्चन यांच्यावर मेहरबान होत असल्याची संतप्त प्रतिक्रियाही काही जणांकडून करण्यात येत आहे.
पालिकेचं स्पष्टीकरण काय?
लोकायुक्त न्यायमूर्ती व्हीएम कानडे यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात बीएमसीने असे म्हटले आहे की, जुहू रस्त्याच्या रुंदीकरणासाठी त्यांच्याकडे रस्ता कंत्राटदार नाही आणि त्यामुळे सध्या महापालिका बच्चन यांच्या बंगल्यावर कारवाई करु शकत नाही. पण पुढील आर्थिक वर्षात कंपाउंड वॉल पाडून पुढची कार्यवाही करु असंही महापालिकेनं म्हटलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांच्या अर्जावर लोकायुक्तांची सुनावणी पार पडली. पालिकेनं अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याच्या भिंतीसंदर्भात काय अॅक्शन घेतलीय याची माहिती लोकायुक्तांनी मागवली आहे. 2017 पासून अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याला नोटीस देण्यात आली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये प्रतिक्षा बंगल्याची भिंत येत असल्यानं, ही भिंत हटवण्याबाबतची ही नोटीस आहे. मात्र, 2017 पासून प्रतिक्षा बंगल्यासंदर्भात पालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही. पालिकेनं दिलेल्या नोटीसनुसार, कारवाई करत नाही, याबाबत नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी लोकायुर्कांकडे अर्ज केला होता.
मुंबईतील जुहू इथल्या संत ज्ञानेश्वर मार्ग रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 2017मध्ये मुंबई महानगरपालिकाने आजू बाजूच्या सर्व इमारती आणि बंगल्यांच्या मालकांना त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला. मात्र अमिताभ बच्चन यांनी यावर कोणतही उत्तर मुंबई महानगरपालिकेला दिले नाही. दरम्यान 2019 मध्ये महापालिकेने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली गेली. पण अमिताभ यांच्या बंगल्यावर अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही.
प्रतिक्षा बंगल्याच्या बाजूला असलेल्या इमारतींवर रस्ता रुंदीकरणाच्या नावाने मुंबई महानगरपालिकेने भिंती तोडण्याची कारवाई केली होती. मात्र त्यानंतर त्या इमारतींमधील लोकांनी कोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की, आमच्या इमारती बाहेर असलेल्या भिंतीवर तोडक कारवाई झाली. मात्र शेजारच्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यांच्या भिंतींवर मात्र ते सेलिब्रिटी आणि व्हीआयपी असल्यामुळे कारवाई नाही झाली.
महत्वाच्या बातम्या
- 'शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब निष्ठावंत कसे?', रामदास कदमांचे गंभीर आरोप
- Raj Thackeray : ज्यांनी पेपर फोडला, ते अजून फुटले नाहीत, म्हणून पेपर वारंवार फुटतो : राज ठाकरे
- ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं : राज ठाकरे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha