(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News: मोठी बातमी! परळ टीटी उड्डाणपूलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना एक जूनपासून 'नो एन्ट्री'
Mumbai News: मुंबईतील महत्त्वाचा उड्डाणपूल असलेल्या परेल टीटी उड्डाणपुलावरून दुचाकी आणि अवजड वाहनांना एक जूनपासून वाहन बंदी करण्यात आली आहे.
Mumbai News: मुंबई शहर आणि पूर्व उपनगर यामधील महत्वाच्या दुवा असणाऱ्या परळ टीटी उड्डाणपूलाच्या (Parel TT Flyover) डागडुजीचे काम मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पूल विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी पावसाळी कामांसाठी उड्डाणपूलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे (Expansion Joint) भरण्यासह रस्त्यावर असणारे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या उड्डाणपूलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना येत्या 1 जूनपासून बंदी घालण्यात येणार आहे.
परळ टीटी उड्डाणपूलावर पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची सुरूवात झाली आहे. याठिकाणी अवजड वाहनांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणत खड्डे पडण्याचा अनुभव येतो. त्यामुळेच मुंबई वाहतूक पोलिसांनी या उड्डाणपूलावर अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, अशी विनंती मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाला केली होती.
दुचाकी, अवजड वाहनांना उड्डाणपूलावर प्रवेशबंदी
अवजड वाहनांना मज्जाव करण्यासाठीचे 'ना हरकत प्रमाणपत्र' महापालिकेला मुंबई वाहतूक पोलिसांकडून मिळाले आहे. त्यामुळेच परळ टीटी उड्डाणपूलाच्या आधी आठवड्याभराच्या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणारा हाईट बॅरियर लावण्यात येणार आहे. याठिकाणी 2.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना प्रवेश करता येणार नाही. फक्त हलक्या वाहनांना या उड्डाणपूलावरून प्रवेश असेल. सद्यस्थितीत पुलाच्या प्रसरण सांध्याचा भाग वाहतुकीसाठी योग्य नाही. त्यामुळे पूलाचे सक्षमीकरण होत नाही, तोवर दुचाकींसाठी हा उड्डाणपूल वाहतूकीच्या दृष्टीने सुरक्षित नाही. या उड्डाणपूलासाठी हाईट बॅरिकेट लावण्यासाठी विभागीय पातळीवर काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे पूल विभागाकडून सांगण्यात आले.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पावसाळी कामांमध्ये उड्डाणपूलांच्या देखभालीच्या कामांना मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांच्या निर्देशानुसार सुरूवात झाली आहे. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये तसेच उड्डाणपूलाचा पर्याय किमान खर्च आणि वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून ऑक्टोबरमध्ये ब्रीजच्या सक्षमीकरणासाठीचे काम उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार आहे. तर 31 मे पर्यंत उड्डाणपूलाची सर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण होतील असा विश्वास पूल विभागाचे प्रमुख अभियंतासंजय कौंडण्यपुरे यांनी व्यक्त केला.
वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या फक्त रात्रीच्या वेळेत या पूलावर दुरूस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येत आहे. रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेतच वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार याठिकाणी खड्डे भरणे आणि सांधे भरण्याचे काम सुरू आहे. हे काम 31 मे पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पूल विभागाने व्यक्त केला आहे.
ऑक्टोबरपासून उड्डाणपूलाचे सक्षमीकरण
मुंबई महानगरपालिकेच्या डिलाईल रोड (लोअर परळ) उड्डाणपूलाचे काम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लोअर परळच्या उड्डाणपूलाचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर परळ टीटी उड्डाणपूलाचे काम हाती येत्या ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार आहे. याठिकाणी पूलाच्या सक्षमीकरणाच्या कामासाठीचे कार्यादेश पूल विभागाकडून देण्यात आले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांनीही ऑक्टोबरपासून या पूलाच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. याठिकाणी एक सॉलिड रॅम्प टाकून सध्याच्या उड्डाणपूलावर नव्या मार्गिकांचा पर्याय वाहनचालकांना मिळेल अशी माहिती महापालिकेने दिली.
पूलाच्या सक्षमीकरणासाठी खालच्या बाजुच्या पोकळीच्या जागा भराव टाकून भरण्यात येणार आहेत. साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी या कामासाठी अपेक्षित आहे. तर 18 कोटी रूपयांचा अंदाजित खर्च या उड्डाणपूलाच्या कामासाठी येणार आहे. विद्यमान उड्डाणपूलाच्या पायाचा आधार घेऊनच नव्या उड्डाणपूलाचा सॉलिड रॅम्प स्थिर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवा उड्डाणपूल बांधण्याचा खर्च आणि वेळ वाचविणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाला शक्य होणार आहे. सक्षमीकरणाच्या प्रकल्पानंतरच अवजड वाहनांना या उड्डाणपूलावरून पुन्हा प्रवेश देण्यात येईल.