(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकनाथ शिंदे यांना तूर्तास अभय, नेतेपदी कायम; शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका
Shiv Sena Meeting : मुंबईतील शिवसेना भवनात शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. एकनाथ शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शिवसेना अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.
Shiv Sena Meeting : शिवसेनेत बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई केलेली नाही. शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदे अजूनही शिवसेनेच्या नेतेपदी कायम राहतील. त्यामुळे त्यामुळे शिवसेना अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे.
मागील पाच दिवस राज्याचे राजकारण शिवसेनेच्या बंडखोरीने ढवळून निघाले आहे. शिवसेना पक्षात आता उभी फूट पडली असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या शिवसेनेचे 38 आमदार असून अपक्षांसह 46 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम हे देखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. रामदास कदमदेखील शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक शिवसेना भवनात पार पडली. स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासाठी शिवसेना भवनात उपस्थित होते.
शिवसेनेच्या घटनेनुसार कार्यकारिणी बैठकीत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल, त्यांना नेतेपदावरुन दूर सारलं जाईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु कार्यकारिणीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झाला नाही. तूर्तास एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना अभय देण्यात आलं आहे.
शिवसेनेत नेतेपद, सचिवपद अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं. एकनाथ शिंदे आणि रामदास कदम हे शिवसेना नेते पदावर आहेत. या दोघानांही नेतेपदावरुन हटवणं हा टोकाचा निर्णय आहे. जर त्यांच्यावर कारवाई करत नेतेपदावरुन हकालपट्टी केली असती, तर शिंदे गटाचे परतीचे दोन कापले गेले असते. त्यामुळेच त्यांना नेतेपदावर कायम ठेवून वेट अँड वॉच अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कार्यकारिणीतील सहकाऱ्यांनी घेतली.
शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर कारवाईस सुरुवात; विधानसभा उपाध्यक्षांनी बजावली नोटीस
बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं आहे. या आमदारांनी त्यांचं मत मांडलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. आजपासून सर्वांना नोटिसा बजावण्यात आली आहे. या आमदारांना सोमवारी 27 जूनपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास अपात्र ठरवण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
शिवसेनेच्या कार्यकारिणीत मंजूर झालेले ठराव
- शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि कायम राहिल.
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर कार्यकारिणीचा विश्वास, त्यांना पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार
- शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे अधिकार पक्षप्रमुखांना
- बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही
- शिवसेनेचे मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्त्वाशी बांधिलकी कायम राहिल.