'1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक, 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट, दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?' नितेश राणेंचा पवारांना सवाल
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषीकेश बेदरे आणि शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो ट्वीट केला आहे.
जालना: अंतरवली सराटीमध्ये (Antarwali Sarati) सप्टेंबर महिन्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या आंदोलनाच्या (Jalna Protest) पाठीमागे कोण आहे? अशा अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा हात आहे, अशा चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. आता भाजप आमदार नितेश राणे (Nitsh Rane) यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषीकेश बेदरे आणि शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्वीट करताना दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा सवाल देला आहे.
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? पवार साहेब, पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणेंनी ट्वीट केलेल्या फोटोमध्ये दगडफेकीतील मुख्य आरोपी हृषीकेश बेदरे, शरद पवार, राजेश टोपे आहे. नितेश राणे म्हणाले, 1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर तीन सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?
ऋषीकेश बेदरेला अंतरवाली सराटी गावात झालेल्या दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जमध्ये अनेक मराठा आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले होते. पण या लाठीचार्जबद्दल दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. जालन्यात पोलिसांनीच आमच्यावर हल्ला केला असा आरोप जरांगे पाटील करत आहेत. तर आंदोलकांनीच पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप दुसऱ्या बाजूकडून करण्यात येत आहे. याच प्रकरणात आता ऋषिकेश बेदरेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बेदरेच्या घरातून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत.
दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
— nitesh rane (@NiteshNRane) November 26, 2023
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली.
पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण… pic.twitter.com/Nti9p7ortQ
ऋषिकेश बेदरेची आंदोलनातली सहभागावर प्रश्नचिन्ह
ऋषीकेश बेदरे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. बीड जिल्ह्यातलं गेवराई हे त्याचं मूळ गाव आहे. वाळू पट्ट्यात त्याची दहशत असते
बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. दरोडा, मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे,जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यात अडवून लूट करणे, दारू विक्री , जुगार, बदनामी करणे यासह इतर अनेक कलमांखाली त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. मराठा आंदोलनातील ऋषिकेश बेदरेच्या सहभागावरती वेगवेगळ्या शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.मनोज जरांगे यांच्यासोबत या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून सक्रिय असलेल्या ऋषिकेश बेदरेची आंदोलनातली नेमकी भूमिका काय होती असा प्रश्न उपस्थित होतोय..
ऋषिकेश बेदरेला आंदोलनात कुणी जाणुनबुजून घुसवलं का?
ऋषीकेश बेदरेला अटक केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी वेगळाच दावा केले आहे. अंतरवाली सराटी गावात झालेल्या लाठीचार्जवेळी पोलिसांनीच पोलिसांवर हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप जरांगेंनी केलाय.अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्जनंतर काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. जिल्हा पोलिस अधीक्षकांची बदली झाली. ऋषीकेश बेदरेला अटक आणि आता नितेश राणेंचे ट्वीट समोक आले आहे. ऋषिकेश बेदरे आणि मनोज जरांगे पाटलांचे अनेक एकत्रित फोटो आहेत. त्यामुळं मनोज जरांगे यांना ऋषिकेश बेदरे याची पार्श्वभूमी माहिती नव्हती का? बेदरेसारख्या पोलीस रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला आंदोलनात का सहभागी करुन घेण्यात आलं? ऋषिकेश बेदरेला आंदोलनात कुणी जाणुनबुजून घुसवलं का? लाठीचार्जनंतर दोनच दिवसात बेदरे शरद पवारांच्या भेटीला का गेला? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत