(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य' यात्रेत गटबाजीचे राजकारण
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर आशीर्वाद घेऊन डॉ. अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची 'शिवस्वराज्य यात्रा' खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आजपासून शिवनेरी किल्ल्यावरुन सुरु झाली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या या शिवस्वराज्य यात्रेत गटबाजीचे राजकारण दिसत आहे. यात्रेच्या नियोजनाबाबत अनेक नेत्यांना विश्वासात घेतलं नसल्याचं समोर येत आहे.
राज्यात इतर पक्षांच्या यात्रा सुरु असताना राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिवस्वराज्य यात्रेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर आशीर्वाद घेऊन डॉ. अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांच्या शहरात लोक सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य निर्माण व्हावे म्हणून ही यात्रा आहे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. तसेच पक्षाला गळती लागलेली नाही. वर काही झालं तरी खालच्या विटा मजबूत असल्यावर फरक पडत नाही, असा विश्वासही अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
महाजनादेश यात्रा 'चालू' मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा
भाजपाची महाजनादेश यात्रा ही 'चालू' मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठीची आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिवस्वराज्य यात्रा जनतेच्या हितासाठी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
खोटं बोला पण रेटून बोला हा मुख्यमंत्र्याचा उद्योग सुरू आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांचा या सरकारने वेळोवेळी अपमान केला आहे. छत्रपतींच्या स्मारकाची एक वीटही अद्याप रचलेली नाही. त्यांच्या नावाने जाहीर केलेली कर्जमाफीही फसवी निघाली. त्यामुळे जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं, धनंजय मुंडे म्हणाले.