Chhath Puja 2022 : छठ पूजेला परवानगी नाकारल्याविरोधात राष्ट्रवादीचा पुढारी हायकोर्टात, सुट्टीकालीन खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश
Chhath Puja 2022 : छठ पूजेला परवानगी नाकारल्याविरोधात राष्ट्रवादीचा पुढारी हायकोर्टातभाजपचं पत्र जोडणाऱ्यांनाच महापालिका प्रशासन परवानगी देत असल्याचा याचिकेत आरोपयाचिकाकर्त्यांना पुढील आठवड्यात सुट्टीकालीन खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश
Chhath Puja 2022 : एका नोंदणीकृत सोसायटीला बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मोकळ्या मैदानावर छठ पूजा (Chhat Puja 2022) करण्यास परवानगी नाकारली आहे. मुंबई महापालिकेच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) एका सदस्याने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आव्हान दिलं आहे. मात्र नियमित कामकाजाचा शुक्रवारी शेवटचा दिवस असल्याने हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुट्टीकालीन न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.
येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी छठ पूजेचं आयोजन करण्यासाठी मुंबईतील एका मैदानावर मंडप आणि छठपूजेसाठी कृत्रिम तलाव बांधण्याची परवानगी मागत 'दुर्गा परमेश्वर सेवा' मंडळाने महापालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र, 19 ऑक्टोबर रोजी महापालिकेने याचिकाकर्त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. त्या निर्णयाला मंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. महापालिकेने भाजपच्या पत्रावर अन्य काही मंडळांना कोणत्याही अर्जाशिवायच छठ पूजा आयोजित करण्याची परवानगी दिल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. वाहतूक आणि अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) असूनही मुंबई पोलिसांनी एनओसी देण्यास नकार दिल्याचा आरोपही या याचिकेतून केलेला आहे.
त्यामुळे इतर मंडळांना दिलेली परवानगी रद्द करावी, अथवा याचिकाकर्त्यांनाही त्या मैदानावर छठ पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मुख्य मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी (20 ऑक्टोबर) न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी पार पडली. तेव्हा, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुट्टीकालीन खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.
छठ पूजा म्हणजे काय?
छठ पूजा ही सूर्यदेवाची उपासना आहे. महाराष्ट्रात लोक ज्याप्रमाणे संक्रांतीला सूर्याची उपासना करतात, त्याप्रमाणे उत्तर भारतीय लोक छठ पूजेच्या निमित्ताने सूर्याची उपासना करतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून अर्थात दिवाळीनंतर छठ पूजेची सुरुवात होते. या पूजेला छठ पूजा तसंच सूर्य षष्ठी पूजा असंही म्हणतात. वेद पुराणातील माहितीनुसार छठ देवी, सूर्यदेवाची बहीण आहे. छठ पूजेच्या वेळी या दोघांची पूजा करुन त्यांना प्रसन्न केलं जातं. छठ पूजेचं व्रत अतिशय कठीण असतं. हे व्रत करणारे 36 तासांचा निर्जळी उपास करतात. छठ पूजा विशेषत: बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, नेपाळ या ठिकाणी केली जाते. संतानप्राप्तीसाठी, पुण्यसंचयासाठी, सुख-समृद्धीसाठी छठ पूजा भक्तीभावाने केली जाते.