(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : उद्धव, थोरात आणि मी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल; शरद पवारांचे वक्तव्य
Sharad Pawar : आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रातील चित्र बदलू शकतो, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
Sharad Pawar : महाराष्ट्रात असलेल्या ऐतिहासिक खजिन्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने अशा संस्थांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. आता सध्या आम्हाला राज्य शासनाशी बोलणे अवघड आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि मी सुद्धा येथे आहे. आम्ही तिघांनी जर ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.
वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्यावतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सहा ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.
यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात, मोडी लिपीबाबत उद्धव ठाकरेंना असलेली माहिती आणि त्यांच्या फोटोग्राफीची प्रशंसा केली. उद्धव ठाकरे यांना दुर्ग भ्रमंती बाबत अतिशय माहिती आहे. ऐतिहसिक गोष्टी अनेक त्यांना माहिती आहेत. त्यांच्याकडे फोटो देखील आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खूप आस्था आहे. ते उत्तम फोटोग्राफर आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी उद्धव यांचे कौतुक केले.
वि.का. राजवाडे संशोधन मंडळ संस्थेच्या कार्याबद्दलही कौतुक करताना शरद पवार म्हणाले की, धुळ्यात जे काम चालू आहे ते वाढवणे गरजेचे आहे. सध्या सरकारला सांगण अवघड आहे. परंतु मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी जर ठरवलं तर काही अडचण येणार नाही, असे सुद्धा पवार यांनी म्हटले. आजचा हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. धुळेकरांना धन्यवाद देतो. राजवाडे संशोधन धुळे ही महत्त्वाची कामगिरी करत आहे. यामध्ये शिवकालीन दुर्ग आदी ही सगळी पुस्तके अतिशय अभ्यास पूर्ण लिहिली आहेत. प्राथमिक शाळेत असताना मोडी लिपी आम्हाला शिकायला मिळाले. मी दक्षिणेत गेलो तेव्हा हे मला पाहायला मिळाले होते. मी मुख्यमंत्री असताना काही लोकांना या भाषेतील लिखाण संबंधात काही लोकांची नियुक्ती केली होती. मोडीतील जे लिखाण आहे त्याचे भाषांतर केले. साने गुरुजींच्या पुस्तकात असे अनेक उल्लेख आहेत. हा अतिशय दुर्मिळ खजिना असल्याचे म्हटले. ह्या इतिहासाच्या पाऊल खुणांचे लिखाण केले गेले पाहिजेत आम्ही ह्या खजिनांचे जतन करण्यासाठी 50 लाखांचे अनुदान जाहीर करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.