Nawab Malik : अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्यासाठी कटकारस्थान सुरु, अमित शाहांकडे तक्रार करणार : नवाब मलिक
Nawab Malik Latest Updates : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबत केला जात आहे, असं मलिक म्हणाले.
Nawab Malik Latest Updates : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबत केला जात आहे, असं मलिक म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तक्रार करणार
मलिक यांनी म्हटलं की, अनिल देशमुख यांच्याप्रमाणे मला अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे. तसे पुरावेचं माझ्या हातात लागले आहेत. काही अधिकारी लोकांना माझ्या विरुद्ध मसुदा तयार करून इमेल करत आहेत. आणि त्यांना माझ्या विरुद्ध तक्रार करायला लावत आहेत. त्यामुळे मी याविरोधात मी कमिशनर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील तक्रार करणार आहे. आशा तक्रारींची चौकशी करायला लावणार आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, गेले 2 महिने मला काही लोकं माहिती देत होते की काही पक्षाचे कार्यकर्ते माझ्या घराची आणि ऑफिसची माहिती घेत आहेत. माझ्या नातवांची देखील माहिती घेण्यात येत आहेत. ते कुठं शाळेत जातात यावर देखील त्यांचं लक्ष आहे. मी दुबईला असताना दोन जण माझ्या घरचे फोटो काढत होते. हे करत असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडलं आहे, असं मलिक म्हणाले. या प्रकरणी मी पोलिसांना तक्रार देणार आहे आणि सीपी यांना देखील पत्र लिहिणार आहे.
ट्वीट करत आपली रेकी केल्याचा मलिक यांचा दावा
नवाब मलिक यांनी ट्वीट करत आपली रेकी केल्याचा दावा केलाय. रेकी करणाऱ्या व्यक्तींचा गाडीसह फोटो पोस्ट केलाय. यासोबत त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय की, ‘ गेल्या काही दिवसांपासून गाडीत बसून हे लोक माझी आणि शाळेची रेकी करत आहे. जर यांना कुणी ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत जे लोक आहेत. त्यांना मला सांगायचेय की, तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला भेटा, सर्व माहिती देईल.’ नवाब मलिकांनी दोन व्यक्तींचे फोटो पोस्ट करत हा दावा केलाय. दोन लोक रेकी करत असलेल्या गाडीचा क्रमांक MH 47 AG 2466 असा आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या हातात कॅमेराही दिसतोय. त्यामुळे नवाब मलिकांच्या दाव्यानं चांगलीच खळबळ माजली आहे.