Navi Mumbai Airport Name Row : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचंच नाव असेल : राज ठाकरे
नवी मुंबईचं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणंच उचित आहे. शिवाजी महाराजांचं नाव आलं तर संघर्षाचा विषय येईल असं मला वाटत नाही. माझ्या बोलण्यानंतर कोण कोण रस्त्यावर उतरतो ते बघू.
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका मांडली आहे. "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावच संयुक्तिक आहे," असं राज ठाकरे म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनीही शिवरायांचंच नाव सूचवलं असतं, असंही त्यांनी म्हटलं. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले की, "आमदार ठाकूर यांनी माझी भेट घेतली. नवी मुंबई होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव द्यावी अशी मागणी त्यांची मागणी आहे. तर सरकारकडून या विमातळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं, अशी भूमिका समोर येत आहे. त्यामधून वाद, मोर्चे, आंदोलन होत आहे. याबाबत पाठिंबा द्यावा यासाठी ते मला भेटायला आले होते. मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आताचं विमानतळ हे डोमेस्टिक राहणार आणि नवी मुंबईत होणारं विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार. ते जरी नवी मुंबई किंवा पनवेल या भागात होणार असलं तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. तिथून टेकऑफ आणि लॅण्डिंग होणारं विमान हे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनच होणार आहे. त्याची जागा फक्त तिथे गेली आहे. शिवडी-न्हावा शेवा मार्ग त्यासाठी केला जात आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचंच नाव राहणार. डोमेस्टिक विमानतळाचं ते एक्स्टेंशन आहे. हा महाराष्ट्र आहे, मुंबई राजधानी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायचंच नाव असेल."
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आदरणीय आहे. दि बा पाटील हे देखील लोकनेते होते, त्याबाबतही दुमत नाही. परंतु हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणंच उचित आहे. शहराच्या बाहेर असलं तरी ते मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखलं जाणार आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी स्वत: सांगितलं असतं की शिवरायांचं नाव दिलं पाहिजे. त्यामुळे महाराजांच्या नावावर चर्चा होऊ शकत नाही. शिवाजी महाराजाचं नाव आलं तर संघर्षाचा विषय येईल असं मला वाटत नाही. माझ्या बोलण्यानंतर कोण कोण रस्त्यावर उतरतो ते बघू. वेळ आली तर या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन." असं राज ठाकरे पुढे म्हणाले.
नामकरणाचा वाद सुरु असताना मनसेच्या आमदारांनी देखील पाठिंबा दिला होता, याविषयी विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, "राजू पाटील मला भेटून गेले. त्यांच्या कानावर ही गोष्ट सांगितलं तेव्हा हा विषयच संपला अशी त्यांची प्रतिक्रिया होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे कोणाचंही येऊ शकत नाही."
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद
नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद उफाळला आहे. विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचंच नाव दिलं जावं, अशी मागणी स्थानिक भूमीपुत्रांकडून केली जात आहे. या मागणीसाठी भूमिपुत्रांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. याआधी झालेल्या आंदोलनात भाजपसह मनसेने देखील पाठिंबा देत सहभाग घेतला होता. परंतु विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाईल, तर दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव दिलं जाईल, असं ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सांगितलं होतं.