(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nana Patole resign : नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा दिला आहे.
मुंबई : अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
बुधवारी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे.
विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा करण्याचे पवारांचे संकेत नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. "विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं आता ते खुलं झालं आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं शरद पवार म्हणाले.
नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यास विधानसभा अध्यक्ष कोण? काँग्रेस पक्षाला देशासह राज्यातील नेतृत्वावरुन सध्या मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं होताना दिसत आहेत. या सगळ्या चर्चेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. जर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्ष पदासाठी कोण? हा सवाल उपस्थित होत आहे. जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.
संग्राम थोपटे भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. वडील अनंतराव थोपटे कडवे काँग्रेस नेते म्हणून ओळखले जातात.त्यांनी मंत्री म्हणून काम केले होते. महाविकास आघाडीत मंत्रीपद न मिळाल्यामुळे संग्राम थोपटे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती.
सुरेश वरपूडकर हे पाथरीमधून निवडून आले आहेत . काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून 1998 मध्ये कृषी राज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. ते परभणी लोकसभा मतदारसंघामधून 98-99 मध्ये खासदारही होते.
अमीन पटेल यांनी हे मुंबईतील आमदार असून ही त्यांची तिसरी टर्म आहे . मुंबादेवी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे.