एक्स्प्लोर
डॉक्टर तरुणीचं हत्या प्रकरण, संशयिताचा फोटो समोर

मुंबई : मुंबईतल्या विलेपार्लेमधील 24 वर्षीय डॉक्टर तरुणीच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्याच्या दिशेने पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हाती लागलेला संशयित मारेकऱ्याचा फोटो पोलिसांनी जारी केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र कालिना फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या मदतीने या फुटेजची स्पष्टता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात लवकर यश येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरात 5 डिसेंबरच्या रात्री 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह राहत्या घरी आढळला होता. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता आणि तिच्यावर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांना आहे. ज्यावेळी मृत तरुणीची हत्या झाली होती, त्याच सुमारास संशयित तिच्या इमारतीबाहेर फिरताना दिसत आहे. तळमजल्यावरील खिडकीतून डोकावण्याचा आणि पहिल्या मजल्यावर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे. मृत तरुणी विलेपार्लेमधील लीलाबाई चाळीच्या पहिल्या मजल्यावरील खोली अभ्यास आणि राहण्यासाठी वापरत असे. तर आई-वडील आणि लहान बहीण तळमजल्यावर राहायचे. तिला खोली आतून बंद न करण्याची सवय होती, असं पोलिसांनी सांगितलं. मृत तरुणी रात्री मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती आणि 12 च्या सुमारास घरी परतली. तिला सोडण्यासाठी आलेले तिचे काही मित्र थोड्या वेळाने निघून गेले. पण रात्री साडेतीनच्या सुमारास रुममधून धूर येत असल्याचं दिसलं. आग लागल्याचं समजताच शेजारी-पाजारी आले आणि त्यांनी रुमचा दरवाजा उघडला. पण समोर मृतदेह त्यांना आढळून आला. इतकंच नाही तर तिच्या शरीराचा काही भाग जळालेला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीने मृत तरुणीला घरात एकटं झोपलेलं पाहून सावज करण्याचा प्लॅन आखला असावा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी नातेवाईक, शेजारी, परिसरातील नागरिक अशा सर्वांकडे चौकशी केली असून संशयिताचा शोध सुरु आहे.
आणखी वाचा























