Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांच्या अपघातासंदर्भातील जनहीत याचिका फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड लावत हायकोर्टानं सुनावलं
Mumbia High Court: याचिकाकर्त्यांचा घटनेशी कोणताही संबंध नसताना अशाप्रकारे जनहीत याचिका दाखल करण चुकीचं असल्याचं हायकोर्टानं मत मांडलं.
![Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांच्या अपघातासंदर्भातील जनहीत याचिका फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड लावत हायकोर्टानं सुनावलं Mumbia High Court rejects PIL filed regarding to cyrus mistry s car accident Marathi news Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांच्या अपघातासंदर्भातील जनहीत याचिका फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड लावत हायकोर्टानं सुनावलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/1cc2396164cf2e6940ebebfbed34313a1672222004111575_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी दखल जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या याचिकाकर्त्यांना अधिकार नाही. ही याचिका निव्वळ प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका असल्याचं मत व्यक्त करत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना आर्थिक दंडही ठोठावला आहे.
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूसाठी चालक डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या जनहित याचिकेतून केली गेली होती. सुरुवातीला हायकोर्टानं या याचिकेवर सुनावणी घेण्यास विरोध दर्शविला होता. याचिकेमागील आपला हेतू काय?, अशी विचारणा करून खंडपीठानं याचिकाकर्त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी तसेच याचिकेत सुधारणा करण्यासाठी संधीही दिली होती. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
कसा झाला युक्तिवाद?
जनहित याचिकाद्वारे मागण्या करताना त्या जबाबदारीनं करणं आवश्यक असून पुरावे वस्तूस्थितीनं सिद्ध करावे लागतात. जनहित याचिकेतील मागण्या या हवेत करता येत नाहीत. याचिकाकर्त्यांनी कोणतेही तथ्य याचिकेतून मांडलेले नसल्यामुळे त्यांच्या याचिकेत जनहित आढळून येत नाही, असा शेराही हायकोर्टानं ही याचिका फेटाळताना मारला आहे. डॉ. अनाहिता पंडोले गाडी दारूच्या नशेत चालवत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आला. अनाहिता यांनी पुरेशी विश्रांती न घेताच गाडी चालविल्यामुळे अपघात झाला.
अपघाताच्या एक दिवस आधी त्या दारूच्या नशेत होत्या असा आरोपही याचिकेतून करण्यात आला होता. मात्र या आरोपांवर अनाहिता यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला. अनाहिता यांनी मद्यप्राशन केले नव्हते, वैद्यकीय चाचणी अहवालातही त्यांनी मद्य घेतलेलं नसल्याचं स्पष्ट झाल्याचं त्यांच्यावतीनं सांगण्यात आलं. यावर कनिष्ठ न्यायालयात याप्रकरणी आरोपनिश्चित झाले आहेत का? अशी विचारणा हायकोर्टानं केली. त्यावर समाधानकारक उत्तर देण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरले. याचिकाकर्त्यांनी केवळ प्रसार माध्यम आणि ऐकीव माहितीच्या आधारावर ही याचिका दाखल केली असून त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे अथवा वस्तूस्थितीची माहिती नाही. त्यामुळे ही प्रसिद्धीसाठीच केलेली याचिका असून ती गुणवत्तेच्या आधारावर ऐकता येणार नाही, असं स्पष्ट करून हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.
काय आहे प्रकरण?
सायरस मिस्त्री 4 सप्टेंबर 2022 रोजी पंडोल दांपत्यासह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज मोटारीनं येत होते. चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडय़ाला त्यांच्या भरधाव मोटारीची धडक बसल्यानं मागील आसनावर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातादरम्यान, मिस्त्री आणि जहांगीर त्यांनी सीटबेल्ट न बांधल्यामुळे ते आसनावरून पुढे फेकले जाऊन त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघाताचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचा दावा करून स्थानिक रहिवाशी संदेश जेधे यांनी अँड. सादिक अली यांच्यामार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)