(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Vaccination : दुसरा डोस का घेतला नाही त्याचं कारण सांगा...मुंबईकरांना थेट महापालिकेचा फोन येणार
Mumbai Vaccination : जवळपास तीन लाख मुंबईकरांनी मुदत उलटून गेली तरी कोरोनाचा दुसरा डोस घेतला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महापालिकेने आता थेट फोन करायचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : तुम्ही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नसेल तर लवकरच मुंबई महापालिकेकडून तुम्हाला फोन येऊ शकतो. यावेळी दुसरा डोस न घेण्याचं कारणही तुम्हाला विचारलं जाणार आहे. कारण मुदत संपल्यानंतरही जवळपास तीन लाख मुंबईकरांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याचं समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका कोरोना काळातील 24 वॉर्ड स्तरीय वॉर रुम्सचा वापर करणार आहे.
या माध्यमातून मुंबईतील लसीकरण मोहीम प्रक्रिया पुढील दहा दिवसांत सुरळीत करण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल. मुंबईत जवळपास पाचशे लसीकरण केंद्रांवर 1.47 कोटी नागरिकांचं लसीकरण झालंय. यांत 92 लाख नागरिकांनी पहिला डोस तर 56 लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतलाय. पण कित्येकांनी म्हणजे जवळपास तीन लाख मुंबईकरांनी वेळेत दुसरा डोस घेतलाच नसल्याचं समोर आलं आहे.
लसीकरण मोहीम सुरळीत करण्यासाठी 24 वॉर्ड स्तरीय वॉर रुम्सचा वापर करणार येणार असल्याचं महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे. वॉर रुममधून फोन करुन दुसरा डोस न घेण्याचं कारण विचारलं जाणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीला दुसरा डोस लवकरात लवकर देण्यासाठीही प्रयत्न केला जाणार आहे.
सध्या मुंबईत पहिला डोस घेणाऱ्यांपेक्षा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेक दिवस उलटून गेले तरीही बऱ्याच नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही. या काळात लसीकरणही योग्य प्रकारे सुरु होतं. तरीही नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी पुढं येत नाहीत. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.
दिवाळी काळात मुंबईतील लसीकरण तीन दिवस बंद असून ही लसीकरण प्रक्रिया पुढील दहा दिवसात सुरळीत केली जाईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :