Mumbai Vaccination : मुंबईतील 10 हजार सोसायट्या 'फुल्ली वॅक्सिनेटेड'; महापालिका विशेष लोगो लावणार
Mumbai Vaccination : मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) एक विशेष मोहीम राबवत असून लसवंत झालेल्या इमारतींवर महापालिका 'फुल्ली वॅक्सिनेटेड'चा लोगो लावणार आहे.
Mumbai Vaccination : मुंबईतील 10 हजार सोसायट्या लसवंत (Fully Vaccinated) झाल्या असून 10 हजार इमारतीतील रहिवाशांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. या इमारतींवर महापालिकेकडून विशेष लोगो लावला जातोय. मुंबईतील 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा लोगो लावण्यात येणार आहे. येत्या जानेवारीपर्यंत संपूर्ण मुंबई लसवंत होणार असल्याचा सत्ताधारी शिवसेनेचा दावा आहे. अशातच मुंबईत एकूण 37 हजार इमारती आहेत. त्यापैकी 22 हजार इमारतींच्या सोसायट्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 10 हजार इमारती संपूर्ण लसवंत झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीनं देण्यात आली आहे.
मुंबईतील 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा लोगो लावण्यात येणार आहे. जिल्हाधीकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी याबाबत सूचना दिल्या होत्या. संबंधित इमारतीत राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या अशा सर्वांचं लसीकरण झालेलं असल्यास अशा इमारतींच्या प्रवेशद्वारावर मुंबई महापालिका विशिष्ट लोगो लावणार आहे. त्यासाठी इमारतीतील सर्व पात्र व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणं आवश्यक आहे. यामुळे ज्यांनी अद्याप लसीकरण केलेलं नाही, किंवा लसीकरणासाठी ज्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते, अशा व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा मुंबई महापालिकेला आहे. तसेच संबंधित इमारतीतील सर्व रहिवाशांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका कमी असल्याचं इतर लोकांनाही समजण्यास यामुळं मदत होणार आहे, असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचं दिसून येत आहे. असं असलं तरी अद्याप सगळ्या मुंबईकरांचं लसीकरण झालेलं नाही. मुंबईकरांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या वतीनं मुंबईत 100 टक्के लसीकरण झालेल्या सोसायटी, इमारती आणि कार्यालयांवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' म्हणजे, पूर्णपणे कोरोनाची लस घेतलेली इमारत, असा फलक लावण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ही संकल्पना आणली होती. इमारतीमध्ये राहणाऱ्या अथवा काम करणाऱ्या अशा सर्वांचं लसीकरण झालेलं असेल, तर इमारतीच्या प्रेवशद्वारावर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा एक लोगो लावण्यात येईल आणि त्यासाठी इमारतीमधील सर्व पात्र व्यक्तींचे दोनही कोरोना लसीचे डोस झालेले असणं आवश्यक आहे, असं मुंबई महापालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आलं होतं. या लोगोमुळे कोरोना प्रसाराचा धोका कमी होईल आणि इतरांनाही प्रोत्याहन मिळेल, अशी अपेक्षा मुंबई महानगरपालिकेला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 420 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 355 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,31,749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4161 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1373 दिवसांवर गेला आहे.