मुहूर्त ठरला! मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो केव्हा धावणार? तिकीट किती असणार? मुंबईकरांना मिळालं उत्तर
अॅक्वा लाईन ही आरे जेव्हीएलआर ते बीकेसी ते कुलाबा अशी एकूण 33 किलोमीटरची मार्गिका आहे. पूर्णतः भूमिगत असलेली ही मेट्रो मार्गिका भारतातली एकमेव मेट्रो मार्गिका आहे.
मुंबई : मुंबईची पहिली वहिली अंडरग्राऊंड मेट्रो सेवा, अर्थात मेट्रो तीनचा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार आहे. बीकेसी ते आरे कॉलनी असा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे. या मार्गासाठी शेवटची परवानगी पुढील आठवड्यात मिळणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय बीकेसी ते कफ परेड हा अंडरग्राऊंड मेट्रोचा टप्पा एप्रिल 2025 पर्यंत खुला करण्याचाही प्रयत्न आहे. पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो प्रवासासाठी मुंबईकरांना किमान 10 रुपये ते 50 रुपये मोजावे लागू शकतात.
अनेक वर्षांपासून मुंबईकर ज्या मेट्रो लाईनची प्रतीक्षा करत होते ती मेट्रो लाईन अखेर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो लाईन म्हणजेच मुंबईच्या भूगर्भातून जाणारी अॅक्वा मेट्रो लाईन. संपूर्ण 33 किलोमीटर लांबीची ही मेट्रो मार्गिका असली तरी या मालिकेचा केवळ पहिला टप्पा मुंबईकरांना आता वापरता येणार आहे. या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहेत.
अॅक्वा लाईन ही आरे जेव्हीएलआर ते बीकेसी ते कुलाबा अशी एकूण 33 किलोमीटरची मार्गिका आहे. पूर्णतः भूमिगत असलेली ही मेट्रो मार्गिका भारतातली एकमेव मेट्रो मार्गिका आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एम एम आर सी एल ने या मेट्रोच्या निर्माण केला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या मार्गिकेच्या पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी हा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात दहा स्थानकांचा समावेश आहे.
स्थानके
- आरे
- सिप्ज
- एम आय डी सी
- मरोल नाका
- CSMIA T2 (एअरपोर्ट)
- सहार रोड
- CSMIA डोमेस्टिक एअरपोर्ट
- सांताक्रूझ
- विद्यानगरी
- बीकेसी
तिकीट दर
मुंबईमध्ये या आधी तीन वेगवेगळ्या मार्गानंवर मेट्रो सेवा सुरू आहे. मात्र अॅक्वा लाईन ही पूर्णतः भूमिगत असलेली मेट्रो लाईन आहे. या मार्गावर कमीत कमी तिकिटांचे दर दहा रुपये असणार आहेत तर जास्तीत जास्त पन्नास रुपयांपर्यंत तिकीट दर ठेवण्यात आले असल्याची माहिती एम एम आर सी एल च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे. या मेट्रोसाठी आपण स्थानकांवर जाऊन तिकीट काउंटर वरून तिकीट काढू शकतो तसेच स्मार्ट कार्डचा उपयोग करून प्रीपेड आणि पोस्टपेड पद्धतीने देखील तिकीट काढता येईल, याच प्रकारे स्मार्टफोन वरून देखील क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढता येणार आहे.
मेट्रो ट्रेन
पहिला टप्पा सुरू करण्यासाठी एकूण नऊ मेट्रो सज्ज आहेत. त्यांच्या दिवसभरात 96 फेऱ्या असणार आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत आपल्याला मेट्रो सेवेचा लाभ घेता येईल. प्रत्येक सहा मिनिटांनी एक मेट्रो उपलब्ध असणार आहे. तसेच एलस्टम कंपनीच्या या आठ डब्यांच्या मेट्रोमध्ये एकावेळी 2400 प्रवासी प्रवास करू शकतील इतकी क्षमता आहे. ताशी 85 किलोमीटर वेगाने ही मेट्रो धावणार आहे. भूमिगत असल्यामुळे या मेट्रोच्या दोन्ही टोकांना आपत्कालीन दरवाजे देण्यात आले आहेत, येणाऱ्या काळात काही महत्त्वाच्या चाचण्या केल्यानंतर ही मेट्रो चालकाशिवाय मेट्रो म्हणून धावणार आहे. त्यासाठी अजून सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र सध्या एकूण 48 मेट्रो चालक नेमण्यात आले असून त्यापैकी दहा महिला आहेत.
अॅक्वा लाईन ही मुंबईच्या सर्व बिझनेस हब एकत्र जोडणारी लाईन आहे. या मालिकेच्या निर्माण साठी सुरुवातीला 23 हजार 900 कोटी रुपये खर्च होणार होते. मात्र वेगवेगळ्या गोष्टींमुळे प्रकल्पाची किंमत 37 हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. मेट्रो मुंबईतील लोकल स्टेशन एअरपोर्ट बेस्ट स्थानक तसेच एसटी डेपोने देखील जोडण्यात आली आहे.भविष्यात बुलेट ट्रेनला देखील ही मेट्रो जोडण्यात येईल. या मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असून दुसरा टप्पा देखील पुढील वर्षी मार्च पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास एम एम आर सी एल ला आहे.या मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर अरे ते कुलाबा हे अंतर एका तासाच्या आत कापणे शक्य होणार आहे. इतकेच नाही तर यामुळे मुंबईतील ट्रॅफिक कमी होऊन प्रदूषण कमी होण्यास देखील मदत होईल.