सायन रुग्णालयात दीड महिन्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबईतील सायन रुग्णालयात कोविड योद्धे असलेल्या डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दीड महिन्याच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सायन रुग्णालयांतील दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. मात्र, त्याच सायन रुग्णालयात कोविड योद्धे असलेल्या डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दीड महिन्याच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. सायन रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतानाही तो स्वीकारुन दीड महिन्याच्या कोविड पॉझिटिव्ह बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातील हे बाळ असून ते आता धोक्याबाहेर आहे.
या बाळाच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ होती. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. अखेर डॉक्टरांनी रात्री तीन वाजता बाळाला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं माहित असूनही भूलतज्ज्ञांसह इतर डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धोका पत्करत ही शस्त्रक्रिया पार पाडली. दरम्यान या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांपैकी काही जण 14 दिवसांसाठी क्वॉरन्टाईन झाले आहेत.
प्रतिक्रिया
डॉ. रमेश भारमल, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता दीड महिन्याच्या बाळाच्या मेंदूवर रात्री तीन वाजता सह जणाच्या डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. या बाळाला आधी काविळ झाली होती, नंतर त्याला सर्दी, खोकला झाला. त्याला 13 मे रोजी सायन रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. रुग्णालयात आल्यानंतर त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर सिटीस्कॅन केल्यानंतर त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं निदर्शनास आलं. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. न्यूरोसर्जन, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, नर्सच्या पथकाने बाळावर खबरदारी घेऊन शस्त्रक्रिया केली. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे.
डॉ. मोना गजरे, बालरोग विभागाच्या प्राध्यापक हे बाळ 13 तारखेला आमच्याकडे आलं होतं. एक महिना आणि पाच दिवसांच्या या बाळाचं वजन दोन किलो होतं. त्याला सर्दी, खोकला, ताप होता. पण त्याची टाळू सुजलेली होती. त्याला फिट देखील येत होत्या. त्यावरुन त्याच्या मेंदूला सूज किंवा इन्फेक्सन असावं, असा अंदाज आम्ही काढला. त्याचं सिटी स्कॅन केलं. बाळाच्या मेंदूच्या डाव्या बाजूला गाठ होती. त्याच्यावर मध्यरात्रीच तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रक्ताची गाठ काढली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे.