कोरोना महामारीत अशाच सहकार्याची अपेक्षा, हाफकिनला लस निर्मितीची मान्यता मिळाल्यानंतर राज ठाकरेंकडून पंतप्रधानांचे आभार
मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
मुंबई : मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यास परवानगी दिल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी ट्वीट करत मोदींना धन्यवाद म्हटलं आणि कोरोना महामारीत राज्याला असंच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन महिन्यापूर्वीच हाफकिनमध्ये लस निर्मितीला परवानगी देण्याची मागणी केली होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनीही दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधानांना पत्र लिहून हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हिंदुस्तान अँटिबायोटिकलला लस उत्पादन करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली. अखेर केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली आहे.
मुंबईतील हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता, मुख्यमंत्री
आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, लसीची संख्या वाढवण्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूमध्ये निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. पंतप्रधानांनी त्याला परवानगी दिली आहे. याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. या महामारीत केंद्राकडून असाच पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
To increase the number of vaccines, I appealed to the PM to allow institutes like Haffkine to begin production. The PM graciously granted permission to Haffkine. I stand in deep gratitude and look forward to a constant support from the Center to overcome this pandemic.@PMOIndia
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2021
राज ठाकरेंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला : नितीन सरदेसाई
याविषयी बोलताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, "आम्हाला यात कुठलंही राजकारण करायचं नाही. परवानगी मिळाली हे जास्त महत्त्वाचं आहे. मात्र राज ठाकरेंनी पत्र लिहिलं आणि दोन दिवसानंतर लगेच परवानगी मिळाली. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला हेच जास्त महत्त्वाचं आहे. तसंच लस निर्मितीसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटला एवढ्या उशिरा परवानगी का मिळाली हे पाहण्यापेक्षा ती आता मिळाली आहे ही बाब महत्त्वाची आहे, असंही नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.