Mumbai Corona Update : मुंबईत आज 168 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 250 रुग्ण कोरोनामुक्त
मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 365 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे.
मुंबई : कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत आज 168 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 250 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 43 हजार 365 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे.
मुंबईत आज दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईचा मृत्यूदर सध्या 0.02 टक्के झाला आहे. मुंबईत सध्या 1 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईत आज28,440 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, मुंबईत आजपर्यंत एकूण 126 लाख 43 हजार 665 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
ओमायक्रॉनचे दोन रूग्ण
ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यानंतर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईतही ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आज मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता १० झाली आहे. दक्षिण आफ्रिकाहून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या व्यक्तीसोबत राहिलेल्या अन् अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे.
या दोन्ही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत , हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पाच अतिजोखमीच्या आणि 315 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या
Omicron Cases In Mumbai : मुंबईचं टेन्शन वाढलं, ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले