Mumbai Rain: मुंबईत येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशीरा
Mumbai News: मुंबई आणि उपनगराच्या परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाच्या सरी काही मिनिटांच्या अंतराने कोसळत असला तरी पावसाचा जोर जास्त आहे. यासोबत जोरदार वारेही वाहताना दिसत आहेत.
मुंबई: जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या उत्तरार्धात सगळी कसर भरुन काढली आहे. पाणीकपातीचा सामना करत असलेल्या मुंबईतही गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. गेल्या आठवड्यातील विकेंडमध्ये मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला होता. सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्रीच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सोमवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या (Mumbai Rain) सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज पहाटेपासूनच मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली असून थोड्याथोड्या अंतराने मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी कार्यालयात आणि दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे.
तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवेवर परिणाम
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटे आणि हार्बर रेल्वेच्या लोकल ट्रेन तब्बल 15 मिनिटं उशीराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेवर अवलंबून असलेल्या चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. अद्याप मुंबईत सखल भागात कुठेही पावसाचं पाणी साचले नाही . पाऊस असल्याने रस्ते वाहतूक नेहमीप्रमाणे संथगतीने आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवलीतही मुसळधार पाऊस
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहेत.
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी साचले आहे. गुरुदेव हॉटेल ते शिवाजी महाराज चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा रस्ताही जलमय झाला आहे.
आणखी वाचा