एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Local | मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक खोळंबली
दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकात पाणी वाढल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाणी वाढल्यानं अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. कल्याणवरुन येणाऱ्या अनेक गाड्या ठाणे स्थानकात उभ्या आहेत.
मुंबई : मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूकवर मोठा परिणाम झाला आहे. कुर्ला आणि वडाळादरम्यान पाणी साचल्यानं गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुर्ला ते वडाळा दरम्यान वाहतूक ठप्प आहे. तर मानखुर्दजवळ ओव्हरहेड वायरवर पुलाचा स्लॅब कोसळला आहे. दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकात पाणी वाढल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाणी वाढल्यानं अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. कल्याणवरुन येणाऱ्या अनेक गाड्या ठाणे स्थानकात उभ्या आहेत.
मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दांडी मारली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.
कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली, ठाणे परिसरात पावसाच्या सरी रात्रीपासूनच कोसळत आहेत. तर अंधेरी, विक्रोळी, कांजूरमार्ग परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस चांगलाच वाढला आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने बॅकलॉग भरुन काढला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मुंबईसह ठाणे उपनगरांत आज मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही मार्गांवरची लोकल सेवा सकाळपासून संथ गतीनं सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई, उपनगर आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आज संपूर्ण मुंबई, उपनगर, ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-कॉलेजला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे नागरिकांनी सुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यावर, बंगले, सोसायटीचा आवारात पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. उस्मा पेट्रोल पंप ते कल्याण शीळ रोड, सुयोग हॉटेलपर्यंत गुडघाभर पाणी आहे. मुसळधार पावसाने कल्याणच्या सखल भागात पाणी साचले आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी
मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. यामुळे रेल्वे सेवेला फटका बसला असून दोन्ही दिशेची रेल्वे सेवा जवळपास तासभर उशिराने सुरू आहे. काल रात्रीपासून कल्याण आणि परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे एकीकडे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असतानाच रेल्वे सेवेलाही याचा फटका बसताना दिसतोय. कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 च्या रुळांवर पावसामुळं पाणी साचलंय. यामुळे कसारा दिशेच्या वाहतुकीला काहीसा फटका बसलाय. दुसरीकडे प्रवासी मात्र तास तासभर लोकलमध्ये वैतागले असून रेल्वेकडून साधी अनाउन्समेंटही केली जात नसल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भविष्य
मुंबई
भारत
Advertisement