Mumbai Rain : मायानगरीत पावसाचा धुमाकूळ, तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू
Mumbai Rain : मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पण या पावसामुळे मायानगरी मुंबईमध्ये तीन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला.
Mumbai Rain : मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पण या पावसामुळे मायानगरी मुंबईमध्ये तीन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गोवंडी, विले पार्ले आणि विद्याविहारमध्ये सहा जणांचं निधन झालेय. तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, अनेक सखल भागात पाणी साचले होते, वाहतूक कोंडीही झाली होती. विद्याविहार आणि विले पार्ले येथे इमारतीचा भाग कोसळल्यामुळे दुर्घटना घडली होती. तर गोवंडीमध्ये मॅनहॉलमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
विद्याविहारमध्ये दोन जणांचा मृत्यू -
मुंबईच्या विद्याविहार येथील 40 वर्ष जुन्या दुमजली इमारतीचा भाग कोसळला होता. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती. ढिगाऱ्याखाली दोन जण अडकले होते. 20 तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अलका पालांडे आणि नरेश पालांडे अशी मृतांची नावे आहेत. तीन जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश आले.
विले पार्ल्यात इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी
विले पार्ले परिसरातही रविवार इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. रविवारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कूपर रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. 65 वर्षीय प्रिशिला मिसाईटा आणि 70 वर्षीय रोबी मिसाईटा या दोघांचा मृत्यू झालाय.
शनिवारी पावसामुळे दोन जणांचा मृत्यू -
पहिल्याच पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. गोवंडीमध्येही पहिल्याच पावसात पाणीच पाणी झाले होते. तुंबलेले पाणी काढण्यासाठी मॅनहोलमध्ये (manhole) सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.सुधीर महेंद्र दास आणि रामकृष्ण निरंजन दास असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई -
मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार
मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील 48 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.