अमेरिकेतून एक फोन आला, मुंबई पोलिसांची सूत्रे हलली आणि 25 वर्षीय तरुणाचा जीव वाचला; वाचा काय घडलं?
Mumbai : आजकाल आयुष्यात कोणताही अडचण आली तरी मित्र, नातेवाईक अथवा कुटुंबियांशी न बोलता प्रत्येकजण गूगलला विचारत असतो.
Mumbai Police Save Life : आजकाल आयुष्यात कोणताही अडचण आली तरी मित्र, नातेवाईक अथवा कुटुंबियांशी न बोलता प्रत्येकजण गूगलला विचारत असतो. गूगलकडून प्रत्येक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबईतील एका तरुणानं आत्महत्या कशी करायची? असं गूगलवर विचारलं.. त्यानंतर थेट अमेरिकेतून मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्याच आधारावर मुंबई पोलिसांनी त्या तरुणाचा जीव वाचवला. शिवाय, त्याचं समुपदेशन करत आत्महत्येचा विचार मनातू काढून टाकलाय.
आत्महत्येचा सोपा मार्ग जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी वाचवले. सदर तरुण हा आयटी इंजीनिअर म्हणून एका खासगी कंपनीत काम करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बुधवारी यूएस नॅशनल सेंट्रल ब्युरो (NCBs) यांच्याकडून इंटरपोल नवी दिल्ली यांना मुंबईतील तरुण आत्महत्या करण्यासंदर्भात गूगलवर सर्च करत असल्याची माहीती देण्यात आली होती. कुर्ला पश्चिम येथील एक इसम हा इंटरनेटवर आत्महत्या करण्याचे सोपे उपाय या विषयी गूगल वर शोध करून आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. सदरची माहीती इंटरपोल, नवी दिल्ली यांनी मुंबई पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या इंटरपोल कक्षास दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुत्रे हलवण्यास सुरुवात केली.
मुंबई पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून व इतर माहितीच्या आधारे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची माहिती मिळवली. त्या 25 वर्षीय तरुणाला किस्मत नगर, कुर्ला परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली. आत्महत्या का करण्याचा विचार करत आहे? यासारखे प्रश्न विचारले. शिक्षणाकरता व दैनंदिन गरजाकरता वेगवेगळ्या खासगी संस्थांकडून त्याने कर्ज घेतले आहे. त्यातच कमी पगारही कमी आहे. त्यामुळे कर्जाचे हफ्ते आणि घरखर्च भागवू शकत नसल्याने नैराश्यग्रस्त होवून आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचं समोर आले. तसेच त्याने यापूर्वी तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांना तपास उघड झाले. त्या तरुणाला ताब्यात घेवून मुंबई पोलिसांनी समुपदेशन केले आणि त्यास आत्महत्येपासून परावृत्त केले. मुंबई पोलिसांनी त्या तरुणाला आईवडिलांचे ताब्यात दिले आहे. त्याचेवर मानोसपचार करण्याबाबत त्याचे आईवडीलांना कळवण्यात आले आहे. मुलाचा जीव वाचवल्याबद्दल आईवडिलांनी मुंबई पोलीसांचे आभार मानले आहेत.
आत्महत्या करण्यापूर्वी मुंबईकरांनी दोनदा विचार करावा, असा सल्ला मुंबई पोलिसांनी दिला आहे. जर कोणी व्यक्ती अशा प्रकारच्या नैराश्यातून किंवा समस्येतून जात असेल. ती व्यक्ती मुंबई पोलिसांशी संपर्क साधू शकते कारण ते नेहमी मदतीसाठी आहेत, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.