Mumbai News : आई जेलमध्ये, सहा महिन्यापूर्वी नोकरी गेली; नैराश्येतून Google वर आत्महत्येबाबत सर्च केलं, मुंबई पोलिसांनी तरुणाला तात्काळ शोधलं
Mumbai News : आत्महत्येच्या तयारीत असलेल्या 28 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी आत्महत्येपासून परावृत्त केलं. संबंधित तरुण गुगलवर आत्महत्या करण्याचे पर्याय शोधत होता.
मुंबई (Mumbai) : आत्महत्येच्या तयारीत असलेल्या 28 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आत्महत्येपासून (Suicide) परावृत्त केलं. संबंधित तरुण गुगलवर (Google) आत्महत्या करण्याचे पर्याय शोधत होता. इंटरपोलकडून (Interpol) याची माहिती मिळताच तपासाला सुरुवात झाली. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 11 ने तांत्रिक माहितीच्या आधारे मालवणी परिसरातून तरुणाला शोधून काढलं. समुपदेशन करुन त्याचं मनपरिवर्तन केलं आणि आत्महत्येपासून परावृत्त केलं.
नोकरी गमावली, जेलमध्ये असलेल्या आईला जामीन मिळत नसल्याने नैराश्य
या तरुणाला नैराश्य आलं होतं. सहा महिन्यांनपूर्वी नोकरी गेल्यामुळे तो नैराश्येच्या गर्तेत सापडला होता. तसंच त्याची आई देखील दोन वर्षांपासून कारागृहात बंदिस्त आहे. आईला जामीन मिळत नसल्याने तो व्यथित झाला होता. त्यामुळे हा तरुण आयुष्य संपवण्याचा निर्णयापर्यंत आला होता. त्यासाठी तो गुगलवर आत्महत्या कशी करावी याचे पर्याय शोधत होता.
माहिती मिळाली, तपास सुरु झाला, पोलीस तरुणापर्यंत पोहोचले
जेव्हा कोणीतरी आपल्या प्लॅटफॉर्मवर अशी माहिती शोधतो तेव्हा आत्महत्या प्रतिबंधक पाऊल म्हणून गुगल याची सूचना इंटरपोलला देतं. यानंतर गुगलकडून या व्यक्तीच्या आयपी अॅड्रेसची माहिती त्याच्या देशातील एजन्सीला दिली जाते. हा तरुण आत्महत्या करण्याचे पर्याय शोधत असल्याची माहिती इंटरपोलकडून मुंबई पोलिसांना मिळाली. मुंबईत, गुन्हे शाखा अशी प्रकरणे हाताळते. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 11 ने तपासाला सुरुवात केली. आयपी अॅड्रेसच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (26 सप्टेंबर) त्याचा माग काढला. हा व्यक्ती मूळचा राजस्थानचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईतील मालवणीमध्ये त्याच्या नातेवाईकांकडे राहत असल्याचं पोलिसांना समजलं. त्याच्या आधारावर मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मालाडमधील मालवणी परिसरात हा तरुण राहत असल्याचं समजलं. यानंतर पोलिसांचं पथक त्याच्या घरी पोहोचलं.
तरुणाचं मनपरिवर्तन झाल्याचा पोलिसांचा दावा
दरम्यान, गुन्हे शाखा 11 च्या पथकाने या तरुणाचं समुपदेशन केलं. आत्महत्या करणं हा उपाय नाही असं सांगून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचं मनपरिवर्तन झाल्याचा दावा गुन्हे शाखेने केला आहे. समुपदेशनानंतर संबंधित तरुणाला चुलत भावाच्या ताब्यात दिलं आहे.
दरम्यान, गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 11 चे अधिकारी या तरुणाला नोकरी मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचं समजतं.
हेही वाचा