Mumbai Police Maratha Protest: मुंबई पोलिसांची जोरदार कारवाई, मराठा आंदोलकांच्या पार्किंगमधील गाड्याही हटवल्या, हालचालींना वेग
Mumbai Police Maratha Protest: उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai Police Maratha Protest: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या संख्येने मराठा आंदोलन एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई आज (दि. 2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा, असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच आझाद मैदान सोडून सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. यानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांच्या पार्किंगमधील गाड्यादेखील पोलिसांनी हटवल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी वाडी बंदर परिसरात असलेल्या गाड्या काढण्यास सुरुवात केली आहे. पूर्व मुक्त मार्गाच्या खाली असलेल्या रोडवरील मराठा आंदोलकांच्या गाड्या दुसरीकडे पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना विनंती करून न्यायालयाच्या देशाचे पालन करण्यास सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या विनंतीमुळे ऑरेंज गेट, वाडी बंदर, भाऊचा धक्का, पूर्व मुक्त मार्ग, बी पी टी रोड परिसर मोकळा होण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात
याच परिसरात आंदोलक मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क करून थांबले होते. मात्र, आता हळूहळू आंदोलक येथून निघत आहेत. मुंबई पोर्टमध्ये जाणारी माल वाहतूक, बीपीएचपी कंपनीत जाणारी टँकर वाहतूक सुरू झाली आहे. तसेच खासगी वाहतूक देखील पूर्ववत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आंदोलकांनी व्यक्त केली नाराजी
दरम्यान, आम्हाला कुठेही थांबू दिले जात नाही, वाशी येथे जाण्यास सांगितले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पार्किंगमध्ये थांबण्यास आम्हाला सांगितले आहे. पण, तिथून देखील आम्हाला बाहेर जाण्यास सांगितले आहे, असे म्हणत मराठा आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
मंत्रालय परिसरातील परिस्थिती काही प्रमाणात पूर्व पदावर
मंत्रालय परिसरात देखील परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. मंत्रालय परिसरात काल काही मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत मंत्रालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त मंत्रालय परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. आज वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते काही प्रमाणात सुरू करण्यात येत आहेत. मात्र आज देखील या परिसरात पोलिसांचा बंदोबस्तकायम आहे.
आणखी वाचा























