अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल
Mumbai Police Registers Case Against ADG Deven Bharti: अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यासह इतरांवर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
FIR Against ADG Deven Bharti : मुंबई पोलिसांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक फटांगडे यांच्यासह सातजणांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कुरुलकर यांच्या तक्रारीवर गुन्हा नोंदवण्यात आला.
ABP न्यूजकडे या FIR ची प्रत आहे. कुरुलकर यांनी पोलिसांना सांगितले, 30 नोव्हेंबर 2017मध्ये निवृत्त झालो. त्याआधी जुलै 2015 मध्ये माझी नियुक्ती स्पेशल ब्रांच-1 मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी झाली. जुलै 2015 ते नोव्हेंबर 2017 मध्ये आम्ही एक यादी तयार केली होती. या यादीत त्यांनी पासपोर्ट तयार करण्यासाठी भारतीय नागरिकत्व असल्याचा पुरावा दिला. मात्र, त्यांचे दस्ताऐवज संशयास्पद होते.
या तपासादरम्यान, रेश्मा खान नावाच्या महिलेने पासपोर्टसाठी दिलेले दस्ताऐवज आमच्यासमोर आले. तिने सादर केलेल्या दस्ताऐवजात जन्माचा दाखला होता. त्यावर 24 परगाना पश्चिम बंगालमधील पत्ता होता. हा पत्ता पडताळणीसाठी एक पथक पाठवण्यात आले. मात्र, तिच्या जन्माच्या दाखल्याची नोंदच तिथं नसल्याचे आढळून आले. ही माहिती मला पडताळणी करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर मी मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फटांगडे यांना या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी पत्र लिहिले. मात्र, फटांगडे हे रेश्माविरोधात गुन्हा दाखल करू देत नसल्याचे त्यावेळी तेथील पोलीस निरीक्षकाने मला तोंडी माहिती दिली असल्याचे कुरुलकर यांनी सांगितले.
त्यानंतर फटांगडे यांनी मला त्यावेळी तत्कालीन सहआयुक्त देवेन भारती यांनी गुन्हा दाखल न करण्यास सांगितले असल्याची माहिती दिली. त्यानंतर देवेन भारती यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटण्यास बोलावले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या केबिन बाहेर रेश्माविरोधात गुन्हा दाखल न करण्यास सांगितले. गुन्हा दाखल केल्यास तुम्हाला त्रास होईल, या महिलेचा संबंध एका राजकीय नेत्यासोबत असल्याचे भारती यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यातील कागदपत्रे नष्ट?
कुरुलकर यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, या प्रकरणात ऑक्टोबर 2020 मध्ये मी माहिती अधिकार अंतर्गत या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची प्रत मागितली, त्यावर 2018 पर्यंतची अनेक कागदपत्रे नष्ट झाली आहेत, असे उत्तर मिळाले. त्यानंतर मी प्रथम अपील केले. त्यावर मागितलेली माहिती शोधून द्यावी असे निर्देश संबंधितांना देण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा मला कागदपत्रे नष्ट झाली असल्याचे उत्तर मिळाले.
कुरुलकर यांच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी ADG देवेन भारती, निवृत्त एसीपी दीपक फटांगडे आणि कथित बांगलादेशी नागरिक रेश्मा हैदर खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा सध्या कुठे आहे याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी अजून कोणाचाही जबाब नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.वि. कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१,४२० आणि ३४ अन्वये एफआयआर दाखल केला आहे.