(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गावदेवी परिसरातील पबमध्ये झालेल्या 'त्या' मारहाणीत आरोपपत्र दाखल, परमबीर सिंह यांच्यावर याच प्रकरणात झाला होता आरोप
मुंबईतील गावदेवी परिसरात गेल्यावर्षी झालेल्या एका मारहाणीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आपलं आरोपपत्र दाखल केलं आहे. हे तेच प्रकरण आहे ज्यात एका पोलीस निरीक्षकानं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात एका आरोपीचं नाव काढण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता.
मुंबई : मुंबईतील गावदेवी परिसरात गेल्यावर्षी झालेल्या एका मारहाणीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आपलं आरोपपत्र दाखल केलं आहे. हे तेच प्रकरण आहे ज्यात एका पोलीस निरीक्षकानं माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात एका आरोपीचं नाव काढण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नुकतंच कोर्टात सात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पबमध्ये काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सात जणांविरोधात पोलिसांनी नुकतंच आरोपपत्र दाखल केलं आले. या प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर दबाव टाकून एका नाव आरोपीचं नाव ओरोपींच्या यादीतून काढण्यास सांगितल्याचा आरोप पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला होता. यास नकार दिल्यानं डांगे यांचं निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर हे निलंबन रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांनी आपल्याकडे 2 कोटी रूपये मागितल्याचा आरोप अनुप डांगे यांनी केला आहे.
पबवर कारवाई केली म्हणून निलंबन, पोलीस निरीक्षकाचे परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप
या प्रकरणावरून डांगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात थेट पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी तक्रारदेखील केली होती. या तक्रारीची आता गंभीर दखल घेत राज्याच्या गृहविभागानं गुन्हा नोंदवून सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत. मात्र या प्रकरणाची चौकशी करणा-या पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या चौकशीतून माघार घेतली आहे. त्यानंतर राज्य सरकारनं याप्रकरणी नव्यानं चौकशीचे आदेश दिले आहेत.
"परमबीर सिंह यांनी अनुप डांगे यांना त्रास दिला" - शिवसेना खासदार विनायक राऊत