Mumbai : मुंबई गुन्हे शाखेच्या श्वान पथकाची परवड! खटारा वाहनानं करावा लागतोय प्रवास
खून, दरोडा, चोरी, घरफोडी, अपहरण यांसारख्या अनेक महत्वाच्या प्रकरणांचा छडा लावणाऱ्या श्वान पथकाला खटारा वाहनातून प्रवास करावा लागत आहे.
Mumbai : गंभीर गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल मुंबई पोलिस अधिकाऱ्यांना बक्षीस मिळते, अधिकाऱ्यांचा सन्मान केला जातो. मात्र खून, दरोडा, चोरी, घरफोडी, अपहरण यांसारख्या अनेक महत्वाच्या प्रकरणांचा छडा लावणाऱ्या श्वान पथकाला खटारा वाहनातून प्रवास करावा लागत आहे. शहरात कुठेही गंभीर गुन्हा घडला कि त्या ठिकाणी या पथकाला जावे लागते. पण गेल्या काही दिवसांपासून या पथकातील श्वान आणि त्यांच्या हॅन्डलर्सना अक्षरश: खटारातून प्रवास करावा लागत आहे. या पथकासाठी असलेल्या तीन गाड्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहेत.
गुन्हे शाखेच्या या श्वान पथकासाठी तीन स्कॉर्पिओ गाड्या आहेत. पण त्या तिन्ही गाड्या काही कामाच्या नाहीत, असं चित्र आहे. एक गाडी नादुरूस्त असल्याने ती दोन वर्षांपूर्वी मोटर वाहन विभागात जमा केली ती अद्याप दुरूस्त करून देण्यात आलेली नाही. दुसरी गाडी काही अंतर गेली की बंद पडते. तर तिसरी ही चालू स्थितीत असलेली स्कॉर्पिओ निव्वळ खटारा बनली आहे.
चालू स्थितीत असलेल्या स्कॉर्पिओ गाडीत श्वानासाठी बसायला नाही. एसी नाही, हॅन्डलर्सला बसायला नीट आसन नाही. तसेच छप्पर गळके आहे. गाडीत पत्रा लागण्याचे प्रकार घडतात. उकाड्यात या खटारातून प्रवास करावा लागत असल्याने श्वानांना तर प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
संपूर्ण मुंबई पोलीस दलात कुरार ते मध्य मुंबईमध्ये मुलुंडपर्यंत एकच श्वान पथक कार्यालय आहे. गुन्ह्याच्या तपास कामी श्वान पथकाकडून खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा सर्वच पोलीस स्टेशनमधून केली जाते. परंतु ज्या श्वानाच्या जीवावर आज मोठे मोठे गुन्हे उघड करण्यासाठी मदत मिळाली आहे. त्याच श्वानांच्या गाडीची आज स्थिती खराब झाली आहे.
सूत्रांनी सांगितले की या श्वानांसाठी AC गाडी चांगल्या स्थितीत असणारी गाडी उपलब्ध होऊ शकत नाही. आज एवढ्या गरमीच्या दिवसांत जिथे आपण काम करणं शक्य होत नाही तिथे आपण या मुक्या प्राण्यांकडून काम करण्याची अपेक्षा केली जात आहे. गाडीमध्ये बसायला हॅन्डलर्सना आसन सुस्थितीत नाही अशा मानसिकतेमधून हॅन्डलर्सआपल्या श्वानाकडून काम करवून घेतो. अशा परिस्थितीत मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय ते दहिसर बोरिवली, मुलुंडपर्यंत पोहोचेपर्यंत त्या श्वान हॅन्डलर्स आणि श्वानाची मेन्टॅलिटी काय होत असेल याचा अंदाज लावणं देखील अशक्य आहे.
या पथकात हनी, व्हिस्की, लियो असे पाच श्वान या पथकात कार्यरत आहेत. जर्मन शेफर्ड, बेल्जिअम शेफर्ड आणि डॉबरमॅन जातीच्या श्वानांची खटारा गाडीतून जाताना प्रचंड गैरसोय होत आहे. श्वान तर नाहीच पण हॅन्डलर्स व्यवस्थित बसू शकत नाही अशी चालू स्थितीत असलेल्या एका गाडीची दुरावस्था झाली आहे.
मोटार परिवहन विभाग नागपाडा मुंबई यांच्याकडे वारंवार गेले 3 वर्षांपासून पत्रव्यवहार देखील केला आहे. श्वानपथकाकरिता AC चालू असणारी आणि सुस्थितीत असणारी गाडी उपलब्ध होऊ शकत नाही, हे दुर्देवच म्हणावं लागेल.