Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी (Mahayuti Oath Ceremony) सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
2022 साली महाराष्ट्रात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी बंड करून त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते की, आपल्यावर टोकाची टीका केली, बदनामी करणाऱ्यांचा आपण बदला घेणार आहे. त्यांना माफ केले हाच आपला बदला आहे. असे वक्तव्य केले होते.
मी त्यांचा पुन्हा बदला घेणार
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना यंदा देखील विरोधकांनी आपली भरपूर बदनामी केली. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर "मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे. त्यांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला", असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जनतेने विरोधकांना सडेतोड उत्तर दिले
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी स्वल्प काय, अन् दीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो. आपल्या राजकारणाच्या सोईसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. महायुतीवर, भाजपवर आणि माझ्यावर जनतेने मोठा विश्वास विधानसभा निवडणुकीत टाकला आणि परस्पर सडेतोड उत्तर दिल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
मविआने अनेकदा विरोधकांचा आवाज दाबला
तर विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या यंदा विधानसभेत फारच कमी असून बहुमतातील सरकार विरोधकांचा आवाज दाबेल, असा आरोप सातत्याने होत आहे. याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही कोणाचाही आवाज दाबणार नाही. विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यांचे प्रश्न मांडण्याची पुरेपूर संधी त्यांना दिली जाईल. महाविकास आघाडीने अनेकदा विरोधकांचा आवाज दाबला, आम्ही त्याविरोधात संघर्ष केला होता, आता आम्ही सत्तेत आल्यानंतर त्याचा आवाज दाबायचा हे मला मान्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा