Vishar Pawar VIDEO : पाठलाग, मारहाण अन् विषप्रयोग; फटका गँगच्या मागे गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यूचा रक्तरंजित थरार
Police Constable Vishal Pawar Death : चोराच्या मागे गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवारला फटका गँगने विषाचे इंजेक्शन दिले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मुंबई : चोरट्यांनी मोबाईलवर फटका मारला, त्यांने ट्रॅकवर उडी मारली, पुढे जे घडलं त्यात 30 वर्षांच्या पोलिस कॉन्स्टेबलचा (Mumbai Police Constable Death) दुर्देवी अंत झाला. 28 एप्रिलच्या रात्री विशालसोबत काय घडलं? त्यांचा मृत्यू कसा झाला? त्यांच्यावर नेमका कुणी हल्ला केला? असे एक न अनेक प्रश्न विशालच्या कुटुंबीयांना सतावत आहेत.
- तारीख- 28 एप्रिल 2024
- स्थळ- सायन
- घटना- फटका गँगकडून हल्ला
- पूर्ण नाव - विशाल पवार
नाईट शिफ्ट असल्यान विशाल रात्री कामाला जायला निघाला. त्याने ठाण्याहून सीएसएमीटीच्या दिशेने धावणारी लोकल पकडली. विशाल हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. विशाल सिविल ड्रेसमध्ये होता. लोकल सायन- माटुंगा दरम्यान पोहचली. विशाल दरवाज्यात फोनवर बोलत उभा होता. तेवढ्यात फटका गँगने विशालच्या फोनवर फटका मारला. फोन खाली कोसळला. चोरटा फोन घेऊन पळून गेला. ट्रेनचा स्पीड कमी असल्यानं विशालने ट्रॅकवर उडी मारली आणि चोराचा पाठलाग करु लागला.
फटका गँगच्या साथीदारांनी विषारी इंजेक्शन दिलं
जवळपास रात्रीच्या 9.30 वाजले होते. चोराचा पाठलाग करत विशाल ट्रॅकवरून धावत होता. तेवढ्यात चोराच्या इतर साथीदारांनी विशालला घेरलं, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विशालने प्रतिकार केला, चोरट्यांनी त्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. दोघांनी विशालला पकडून ठेवलं. तेवढ्यात एकाने विशालच्या पाठीवर विषारी इंजेक्शन टोचलं. विशालच्या तोंडात लाल रंगाचे द्रव ओतलं, त्यानंतर विशाल शुद्ध हरपून जमिनीवर कोसळला आणि चोरटे फरार झाले.
अस्वस्थ वाटल्याने रुग्णालयात भरती
दुसऱ्या दिवशी विशालला जाग आली. त्यानं कसबसं घर गाठलं. सोबतच्या एका पोलीस अधिकाऱ्याला त्याने सगळी हकीकत सांगितली. विशालची प्रकृती बिघडल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. दोन दिवसात विशालची प्रकृती अधिकच खालावली आणि बुधवारी विशालची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. या घटनेनं पोलिस दलात एकच खळबळ उडाली.तर मुंबईसारख्या शहरात आता पोलिसच सुरक्षित नाहीत का असा प्रश्नही विचारला जात आहे.
विशाल पवार हा फक्त 30 वर्षांचा होता. 2015 साली तो पोलीस खात्यात भरती झाला होता. गेल्या तीन वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. मूळचा जळगावचा असलेला विशाल सध्या ठाण्यात राहायला होता. त्याचे आई-वडील जळगावातच वास्तव्यास आहेत.
विशालच्या मृत्यूनं पवार कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला. तरुण वयात पोटचा लेक असा अचानक गेल्यानं आई-वडील हादरून गेलेत. आपल्या आयुष्याचा जोडीदार असा एक रात्रीत साथ सोडून जाईल असं विशालच्या पत्नीला वाटलंही नसेल.
काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सुरक्षेच्या मुद्द्याला हात घालणारी आहे.