Mumbai : मास्क न घालणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची धडक कारवाई, एका दिवसात 6 हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल
मध्यंतरी मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचं मुंबई पोलिसांनी थांबवलं होतं. आता ही मोहीम पुन्हा एकदा युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. (Mumbai police fine those who do not wear masks).
मुंबई : काही दिवसांपूर्वी मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मोहीम उघडली होती. महानगरपालिकेप्रमाणेच मुंबई पोलिसांनी सुद्धा मास्क न घालणाऱ्यांना दंड आकरण्यास सुरुवात केली होती. मात्र मध्यंतरी मुंबई पोलिसांनी ही कारवाई बंद केली होती. आता गुरुवारपासून ही कारवाई पुन्हा युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आल्याचं दिसतंय. मुंबई पोलिसांनी एकाच दिवसात मास्क न घालणाऱ्या 6474 लोकांकडून दंड वसूल केला आहे. (Mumbai police fine those who do not wear masks)
मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला असून रुग्ण संख्या पुन्हा वाढू नये म्हणून मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबईमध्ये 13 परिमंडळ आहेत. गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रत्येक परिमंडळामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त एक विशेष पथक सुद्धा नेमण्यात येणार आहे. म्हणजेच मुंबईमध्ये 13 विशेष पथक पोलिसांकडून नेमण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात जे मास्क घालणार नाही किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्यावर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.
गुरुवारी संपूर्ण मुंबईमध्ये मास्क न घालणाऱ्यां विरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. सर्वात मोठी कारवाई दिंडोशी ते दहिसर पर्यंत असलेल्या परिमंडळ 12 मध्ये करण्यात आली. इथे 719 लोकांना पोलिसांनी दंड आकारला आहे. तर काळाचौकी ते सायन पर्यंत असलेल्या परिमंडळ 4 मध्ये मास्क न घालणाऱ्या 666 जणांवर कारवाई करण्यात आली. तर परिमंडळ 6 मध्ये 646 जणांवर कारवाई करण्यात आली. चेंबूर ट्रॉम्बे हा परिसर परिमंडळ सहाच्या हद्दीत येतो. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय लोकं वस्ती आहे.
दादर, शिवाजी पार्क, माहीम, विनोबा भावे नगर, कुर्ला या परिसरांचा समावेश परिमंडळ 5 मध्ये होतो. या ठिकाणी मास्क न घालण्याऱ्या 555 लोकांवर कारवाई करण्यात आली.
परिमंडळ 2 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली. या परिमंडळात मास्क न घालण्याऱ्या 549 लोकांवर कारवाई करण्यात आली. पायधुनीपासून ते मलाबार हिलपर्यंत या परिसराचा समावेश परिमंडळ दोन मध्ये होतो.
भायखळा ते वरळी पर्यंतचा परिसर परिमंडळ तीन मध्ये येतो. या ठिकाणी मास्क म घालणाऱ्या 542 लोकांवर कारवाई करण्यात आली. घाटकोपर पासून ते मुलुंड पर्यंतचा परिसर हा परिमंडळ सात मध्ये येतो. या ठिकाणी 553 जणांवर कारवाई करण्यात आली.
मुंबई पोलिसांकडून लोकांना आवाहन करण्यात आलं आहे की ते त्यांनी घराबाहेर पडताना मास्क घालावं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे नियम शासनाने आखून दिले आहेत त्यांचा पालन करावं. अन्यथा त्यांना अशा कारवायांना सामोरं जावं लागेल.
महत्वाच्या बातम्या :