Mumbai Aarey Metro Car Shed: आरेत झाडांवर कुऱ्हाड, मेट्रो कारशेडचे काम सुरू? काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती
Mumbai Aarey Metro Car Shed: मुंबईतील आरे परिसरात झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असून कारशेडचे काम सुरू होणार असल्याशी शक्यता आहे.
Mumbai Aarey Metro Car Shed: मुंबईतील आरे परिसरात कारशेडचं काम सुरु करण्यात आले असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. सध्या आरे परिसरातील मुख्य रस्त्यावरील झाडांच्या छटाईचं काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी आरे परिसरात जाणाऱ्या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. फक्त आरे परिसरातील रहिवाशी सोडता इतर कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही आहे. आज मध्यरात्रीपर्यंत झाडं कापण्याचे काम सुरू असणार आहे. दरम्यान, काही आंदोलकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या असून त्यातील काहीजणांना ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आरेमधील जंगलात मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी राज्य सरकारने उठवली होती. त्यानंतर आरे मेट्रो कारशेडचे काम वेगाने सुरू होणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांकडून दिसू लागले होते. त्यानंतर आजपासून आरेमधील झाडे कापण्यास सुरुवात करण्यात आली. गोरेगाव ते पवईला जाणारा आरेमधील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. फक्त आरेमधील रहिवासींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. आरेमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मेट्रो कारशेडचे काम सुरू?
मुंबई वाहतूक पोलिसांनी काढलेल्या पत्रकानुसार आज रात्री 12 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 दिवस पोलिसांचा बंदोबस्त कायम असणार आहे. मेट्रो-3 च्या बोगीज आरेमध्ये आणण्यासाठी कोणताही अडथळा होऊ नये यासाठी वृक्ष छटाईचं काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरेमधील मेट्रो कारशेड ज्या ठिकाणी उभे करण्यात येणार आहे, त्याठिकाणी अद्याप वृक्षतोड करण्यात आली नसल्याची माहिती आहे. कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणी असलेली झाडे अद्यापही कापण्यात आली नाहीत अथवा कोणतेही बांधकाम सुरू झाले नाही. मात्र, मेट्रोच्या बोगीज् आणणार आहेत, त्यामुळे लवकरच कारशेडचे काम सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पर्यावरणप्रेमींना पोलिसांच्या ताब्यात
मुंबईतील आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर पर्यावरणप्रेमींकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. जवळपास 20 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी तबरेज सय्यद आणि जयेश भिसे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तरबेज सय्यद यांना आरे पोलिसांनी रविवारी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. त्यानंतर वनराई पोलिसांनी तरबेज यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे मत 'आरे वाचवा'च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.