Mumbai Traffic Jam : पाऊस आणि खड्ड्यांमुळे मुंबईचा वेग मंदावला, पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य
Mumbai Traffic Jam : मुंबईमध्ये सुरु असलेला पावसामुळे आणि खड्ड्यांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे.
Mumbai Traffic Jam : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे (Pothole) साम्राज निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये सुरु असलेला पावसामुळे आणि या खड्ड्यांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) पाहायला मिळत आहे. यामुळे दक्षिण मुंबईत कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचा मोठा खोळंबा झाला. पाऊस, खड्डे आणि दृश्यमानता कमी झाल्याने ऐन पिक अवरला पश्चिम द्रूतगती महामार्गावर सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरीमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव आणि बोरिवली या दोन ठिकाणी हायवेवर दीड ते दोन फुटांच्या आकाराचे खड्डे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमधून दुचारीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू होण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन दिवस पूर्वी हे सर्व खड्डे बुजवले होते. मात्र हे खड्डे कसे भरले होते, त्यांचं काम किती निकृष्ट दर्जाचं होतं याची पोलखोल दोन दिवसांच्या पावसात झाली आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावर पावसामुळे वाहतूक संथ गतीने
मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर (Eastern Express Highway) पावसामुळे वाहतूक संथ गतीने पाहायला मिळत आहे. सायन, दादर भागात सखल भागात पाणीच साचल्याने घाटकोपर ते सायन वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद हायवेवर दरड कोसळल्याने वाहतूक मंदावली
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) ढेकाळे जवळ दरड (Landslide) कोसळल्याने वाहतूक मंद गतीने सुरु आहे. सध्या या महामार्गावर दरड कोसळलेल्या वाहिनीवरुन धीम्या गतीने एकेरी वाहतूक सुरु आहे. परंतु पाऊस असल्यामुळे दरड हटवण्याचं कामाला हवा तसा वेग मिळत नाही. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे. एमएमआरडीएच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर खोदलेल्या टेकडीला कोणतीही संरक्षक भिंत तयार न केल्याने ही दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट
मुंबईत सलग 6 दिवस 4.5 मीटरपेक्षा जास्त उंच लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास पेक्षा जास्त असेल. मुंबईत 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबईत ऑरेंज आणि रेड अलर्ट दरम्यान, नागरिकांना सकाळी 10 नंतर समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी नाही. मुसळधार पावसामुळे अपघात होऊ शकतो म्हणूनच मुंबई महापालिकेने सूचना जारी केल्या आहेत.