Mumbai News : मुलुंडमध्ये व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांच्या धाडीदरम्यान तब्येत बिघडून एकाचा मृत्यू
व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने धाड टाकली. पार्लरवर अचानक धाड पडल्यामुळे दिलीप याच्या छातीत कळ आली आणि ते जागीच बेशुद्ध झाला
मुंबई : मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडी दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिमेला असलेल्या संगम व्हिडीओ गेम पार्लरवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गुरुवारी (28 एप्रिल) टाकलेल्या धाडीमध्ये दिलीप रावजी शेजपाल या 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
मृत दिलीप हा कल्याणचा रहिवासी असून भांडुपमध्ये एका खासगी कंपनीत कलेक्टर म्हणून काम करत होता. ऑफिसचं काम संपल्यानंतर दिलीप शेजवाल संगल व्हिडीओ पार्लरमध्ये गेला. पोलिसांच्या छाप्यादरम्यान पार्लरमध्ये असलेले ग्राहक पळू लागले. याच वेळी दिलीप घाबरला आणि अचानक जमिनीवर कोसळला
या व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर या शाखेच्या अधिकाऱ्यांनी या पार्लरवर रात्रीच्या वेळी धाड टाकली. त्यावेळी दिलीप हा पार्लरमध्ये होता. अचानक पार्लरवर पोलिसांची धाड पडल्यामुळे दिलीप याच्या छातीत कळ आली आणि त्याची तब्येत बिघडली. तो जागीच बेशुद्ध झाला. त्याला पोलिसांनी महापालिकेच्या अग्रवाल शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी दिलीपला मृत घोषित केले.
दरम्यान पोलिसांनी दिलीप शेजपाल यांना मारहाण केल्याचा आरोप होत होता. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. असं काहीही झालं नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर कुटुंबानेही बोलण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.
इतर बातम्या