लोनच्या नावावर लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश
सदर व्यक्ती लोकांना लोनसाठी फोन करून त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीसच्या नावाने आगाऊ पैसे घ्यायचा, अकाऊंट मध्ये पैसे आल्यानंतर फोन बंद करून पसार व्हायचा.
मुंबई : मुंबईतील मालाड सायबर पोलिसांनी लोनच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. सदर व्यक्ती लोकांना लोनसाठी फोन करून त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीसच्या नावाने आगाऊ पैसे घ्यायचा, अकाऊंट मध्ये पैसे आल्यानंतर फोन बंद करून पसार व्हायचा.
तक्रारदार सुमित बंसाली मुंबईच्या मालाड परिसरात राहणारा आहे. सुमित नेहमीच आपले काही पैसे लाइफ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये गुंतवायचा एक दिवस सुमितला दिल्लीवरून लोनसाठी फोन आला आणि त्यावेळी सुमितला लोनची गरज होती. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सुमितने सांगितलं की त्याला 12 लाख रुपयांची अत्यंत गरज होती आणि त्याच वेळेला त्याला लोनसाठी फोन आल्याने आनंदित झाला.
अखीलेश शर्मा नावाच्या व्यक्तीचा त्याला फोन आला होता, ज्याने सुमितला सांगितलं की 12 लाखाचं लोन होऊन जाईल मात्र त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, आणि प्रोसेसिंग फी म्हणून 2 लाख 80 हजार रुपये द्यावे लागतील. सुमितने ते पैसे ट्रान्सफर केले. सुमितच्या मोबाईलवर आलेल्या कॉलची तपासणी जेव्हा पोलिसांनी केली तेव्हा त्यांना मोबाईलचे डिटेल्स आणि लोकेशन दिल्लीतील असल्याचं कळालं त्यानंतर पोलिसांचं पोलीस हवालदार अशोक कोंडे, शिपाई अभंग, अनिल आडीवरेकर हे पथक दिल्लीला रवाना करण्यात आलं.
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की लोन प्रोसेसिंग फी साठी ज्या अकाउंट मध्ये पैसे पाठवण्यात आले होते ते अकाउंट मनीष अखिलेश शर्मा वय 22 वर्ष नावाच्या व्यक्तीचे होतं जो दिल्लीत राहणारा होता. पोलिसांनी जेव्हा मनीषला अटक केली तेव्हा त्याच्याकडून एक मोबाईल सापडला मनीष एक कॉल सेंटर चालवत होता जिथून लोकांना लोन साठी फोन करून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. त्या कॉलसेंटर मध्ये 6 सुशिक्षित लोकं काम करत होती. आरोपी शर्मा बँक डिटेल्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड डिटेल्स देणाऱ्याला १२०० रुपये पर्यंत रक्कम द्यायचा. त्यामुळे त्याच्या बरोबर अजून काही लोक सामील असल्याचा संशय पोलिसांना आहे.
सामान्य माणसं आपल्या बहुतांश गरजा लोन घेऊन भागवतात आणि आपल्या मेहनतीच्या पैशाने त्या लोनचे हप्ते फेडत असतात मात्र याच परिस्थितीचा फायदा काही भामटे घ्यायला तयार असतात. अशाच एका भामट्याला मालाड सायबर पोलिसांनी अटक केली असून त्याने आत्तापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे आणि हे रॅकेट नेमका किती मोठा आहे याचा तपास केला जात आहे.
आरोपी अखिलेश शर्माला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत, तर दुसरीकडे लोकांनाही पोलिसांनी अशा भामट्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे आणि शिवाय अशा कोणत्याही प्रकारे कोणाचीही फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचं आवाहनही केलं आहे.