Mumbai News : बिपरजॉय वादळाच्या अलर्टनंतरही जुहू बीचवर सहा मुलं पोहायला गेली; दोघांना वाचवलं, दोघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरु
Mumbai News : बिपरजॉय चक्रीवादळाचा अलर्ट असूनही मुंबईच्या जुहू बीचवर पोहायला गेलेली सहा मुलं बुडाली. सहापैकी दोन मुलांना वाचवण्यात आलं. तर उर्वरित चारपैकी दोन मुलांचे मृतदेह सापडले असून दोन जणांचा शोध सुरु आहे.
Mumbai News : बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy) अलर्ट असूनही मुंबईच्या जुहू बीचवर (Juhu Beach) पोहायला गेलेली सहा मुलं समुद्रात बुडाली. सहापैकी दोन मुलांना वाचवण्यात आलं. तर उर्वरित चारपैकी दोन मुलांचे मृतदेह सापडले असून दोन जणांचा शोध सुरु आहे. काल (12 जून) संध्याकाळी ही घटना घडली.
काल संध्याकाळी आठ मुलांचा एक ग्रुप जुहू बीचवर आला होता. ही सर्व मुलं वाकोल्याहून जुहू कोळीवाड्याच्या बाजूने असलेल्या समुद्रकिनारी पोहण्यासाठी आले होते. आठ जणांपैकी दोघांनी पाण्यात जाण्यास नकार दिला. तर उर्वरित सहा जण समुद्रात उतरले. मात्र समुद्रातील जोरदार लाटांमुळे सर्व 6 जण बुडू लागले, त्यापैकी दोन जणांना लाईफगार्ड्सनी (Life Guards) कसंतरी वाचवलं, मात्र चार मुलं खोल समुद्रात बुडाले. यापैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकाचा मृतदेह रात्री तर आज पहाटे एक मृतदेह सापडला. उर्वरित दोन मुलांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरु आहे.
चक्रीवादळाच्या अलर्टनंतरीही मुलं समुद्रात गेले
बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे. परंतु यानंतरही या मुलांनी वादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि समुद्रात उतरले. तिथे तैनात असलेल्या लाईफगार्ड्सनी त्यांना समुद्रात न जाण्यास सांगितलं होतं. गार्डने शिटीही वाजवली होती, पण तरीही सहा मुलं आत गेली.
बुडालेली चार मुले सांताक्रूझ इथले रहिवासी
धर्मेश भुजियाव (वय 15 वर्षे), जय ताजभरिया (वय 16 वर्षे), भाई मनीष (वय 15 वर्षे) आणि शुभम भोगनिया (वय 16 वर्षे) अशी समुद्रात उतरलेल्या मुलांची नावे आहेत. हे सर्वजण सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला येथील दत्त मंदिर परिसरातील रहिवासी आहेत. त्याचवेळी, समुद्रात उतरल्यानंतरही थोडक्यात बचावलेल्या एका मुलाचे नाव दीपेश करण (वय 16 वर्षे) आहे.
जुहू बीच लोकांसाठी बंद होता
बिपरजॉय चक्रीवादळाच्या अलर्टनंतर सोमवारी समुद्रकिनारा नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी चार लाईफगार्ड तैनात होते. संपूर्ण बीचवर एकूण 12 लाईफगार्ड होते. दरम्यान अग्निशमन दलाचे कर्मचारी, मुंबई पोलीस, बीएमसी कर्मचारी, लाईफगार्ड आणि शीघ्र कृती वाहन सध्या घटनास्थळी उपस्थित असून उर्वरित दोन मुलांचा शोध घेतला जात आहे.
VIDEO : Youths Drown at Juhu Beach : जुहू चौपाटीवर 4 मुलं बुडाली, दोघांचे मृतदेह ताब्यात
संबंधित बातमी
Juhu Accident : जुहू चौपाटीवर पोहायला गेलेल्या आठ मुलांपैकी चार जण बुडाले, चार जणांना वाचवण्यात यश