(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News : शाळेत जायचं नाही म्हणून रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, पोलिसांची तारांबळ
Mumbai News : घाटकोपरच्या अशोकनगर विभागात राहणाऱ्या 11 वर्षीय मुलाला परीक्षेत कमी गुण पडले होते. त्यामुळे शाळेत पडणारा ओरडा नको होता. अशातच मोठ्या भावाच्या मोबाईलवर अपहरणाचे फेक मेसेज त्याने पाहिले होते.
मुंबई : समाजमाध्यमात मुलांच्या अपहरणाचे फेक मेसेज मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत. आता याचा वाईट परिणाम आता लहान मुलांवर देखील होताना दिसत आहे. घाटकोपरमध्ये एका 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांने शाळेत जायचे नाही म्हणून स्वतःचा अपहरण झाल्याचा बनाव रचला. यामुळे घाटकोपर पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. नंतर हा बनाव त्या मुलानेच केला असल्याचे कबुल केले.
घाटकोपरच्या अशोकनगर विभागात राहणाऱ्या 11 वर्षीय मुलाला परीक्षेत कमी गुण पडले होते. त्यामुळे शाळेत पडणारा ओरडा नको होता. अशातच मोठ्या भावाच्या मोबाईलवर अपहरणाचे फेक मेसेज त्याने पाहिले होते. मग आपले ही असेच अपहरण झाल्याचे सांगितले तर आपल्याला घरचे शाळेतच पाठविणार नाही असे या मुलाला वाटले. मग या मुलाने प्लॅन केला. त्याने स्वतःकडील दप्तर एका शेजाऱ्याच्या घरी ठेवले आणि त्यांना आपले आईवडील घरी नाहीत हे दप्तर इथेच ठेवा असे सांगितले. नंतर कपडे आणि केस विस्कटून घरी गेला. घरी जाऊन आपले दोन जणांनी शाळेत जात असताना अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्याच्या आईवडिलांनी मुलाला सोबत घेऊन घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. मुलाने आपल्याला शाळेत जात असताना दोन जणांनी चालू रिक्षात ओढून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. माझे तोंड दाबले पण मी उडी मारली आणि पळून आलो परंतु माझे दप्तर ते घेऊन गेले अशी माहिती त्याने पोलीस अधिकाऱ्यांना ही सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांनी तात्काळ पथके तयार करून या रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले. मात्र सीसीटीव्ही आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून अशी घटना घडलीच नसल्याचे समोर आले. या नंतर पोलिसांनी या मुलालाच विश्वासात घेऊन विचारले असता त्याने हा बनाव रचल्याचे सांगितले. आपल्याला शाळेत कमी मार्क पडले आहेत. मला शाळेत जायचे नव्हते आणि फेक मेसेजप्रमाणे आपण ही आपले अपहरण झाले सांगितले. तर शाळेत जाऊ देणार नाही म्हणून हे केल्याचे त्या मुलाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी देखील एवढ्या मुलाने रचलेल्या या बनावामुळे डोक्याला हात लावून घेतला. मात्र त्या नंतर या मुलाला पुन्हा असे करू नये असे समजावून त्याला पालकांच्या हवाली केले.
संबंधित बातम्या :
Nashik Rumors : नाशिकमध्ये लहान मुलांच्या अपहरणाचा 'फेक मॅसेज', पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन