मुंबई मनपा आयुक्तपदी भूषण गगराणी? डॉ. संजय मुखर्जी आणि अनिल डिग्गीकर यांचीही नावं चर्चेत
मुंबई मनपा आयुक्तपदासाठी भूषण गगराणी प्रबळ दावेदारडॉ. संजय मुखर्जी आणि अनिल डिग्गीकर यांचीही नावं चर्चेत
Election Commission Decision: मुंबई : महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाला (Election Commission of India) पाठवलेल्या अहवालात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी भूषण गगराणी (Bhushan Gagrani), अनिल डिग्गीकर (Anil Diggikar) आणि संजय मुखर्जी (Sanjay Mukherjee) या तीन IAS अधिकाऱ्यांची नावं सुचवली आहेत. निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना बीएमसी (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली करण्याचे निर्देश दिले. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनंतर सरकारनं बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची बदली केली. इक्बाल सिंह चहल 8 मे 2020 पासून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून कार्यरत होते. अशातच आता मुंबई महापालिकेचं आयुक्तपद कोणाकडे जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ज्यांनी त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे किंवा त्यांचा या वर्षी जूनपर्यंत कार्यकाळ पूर्ण होईल, निवडणूक आयोगानं राज्य सरकारला बीएमसी आणि इतर नागरी संस्थांचे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांची बदली करण्यास सांगितलं होतं. एका वरिष्ठ सरकारी एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, "सरकारनं निवडणूक आयोगाच्या निर्देशाचं पालन केलं आहे आणि भूषण गगराणी, अनिल डिग्गीकर आणि संजय मुखर्जी या तीन IAS अधिकाऱ्यांचं पॅनेल पाठवलं आहे. ECI च्या निर्णयानंतरच या तीन अधिकाऱ्यांपैकी एकाची BMC आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे."
मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी भूषण गगराणी प्रबळ दावेदार
मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी भूषण गगराणी प्रबळ दावेदार आहेत. नव्या आयुक्तांचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी भूषण गगराणी, डॉ. संजय मुखर्जी आणि अनिल डिग्गीकर यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्यात आली आहे.
1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी भूषण गगराणी हे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. गगराणी यांच्याच बॅचचे डिग्गीकर हे बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचे महाव्यवस्थापक आहेत, तर 1996 बॅचचे मुखर्जी हे मुंबई महानगर प्राधिकरणाचे आयुक्त आहेत. ईसीआयचे उत्तर येईपर्यंत चहल बीएमसी आयुक्तपदी कायम राहतील, असं अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, नगरविकास विभागानं मंगळवारी विविध नागरी संस्थांच्या 34 उपायुक्तांच्या तत्काळ प्रभावानं बदल्या केल्या. 18 मार्च रोजी जारी केलेल्या निर्देशांनुसार, निवडणूक आयोगानं राज्य सरकारला चहल यांची बदली करण्यास सांगितलं होतं, पूर्वीचे आदेश असूनही तसं करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
अभिजीत बांगर आणि अमित सैनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्त
सामान्य प्रशासन विभागानं जारी केलेल्या निर्देशांनुसार, अश्विनी भिडे यांची बदली मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर भिडे यांच्याजागी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनींची नियुक्ती झाली आहे. मुंबई महापालिकेचे आणखी एक अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची नेमणूक करण्यात आली आहे. वेलारासू यांची बदली करताना त्यांना नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आलं आहे.