(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Monsoon: मुंबईत 'ब्रेक के बाद' मान्सून अॅक्टिव्ह; कुठे रिमझिम, तर कुठे पावसाची कोसळधार, 24 जूनपर्यंत वातावरणात गारवा कायम!
Mumbai Monsoon News: गेल्या काही महिन्यांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. काहीशा विश्रांतीनंतर मुंबईत मान्सून पुन्हा अॅक्टिव्ह झाला आहे.
Mumbai Monsoon Updates: मुंबई : अल्पावधीच्या विश्रांतीनंतर मान्सून (Monsoon Updates) मुंबईत (Mumbai News) पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाला आहे. मुंबईत बुधवारपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी मुसळधार पावसानं (Heavy Rain) हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Department of Meteorology) जारी केलेल्या माहितीनुसार, येत्या 24 जूनपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अंगाची लाहीलाही करणाऱ्या मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. काहीशा विश्रांतीनंतर अॅक्टिव्ह झालेल्या पावसानं मुंबईसह उपनगरांत हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत. मुंबईत 19 जून रोजी सकाळी 8 ते 20 जून रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत पश्चिम उपनगरात सरासरी 59.30 मिमी, पूर्व उपनगरात 29.56 मिमी आणि शहरात 19.98 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी बरसल्या. अरबी समुद्रातून येणाऱ्या सक्रिय पश्चिम वाऱ्यांमुळे मुंबईसह आसपासच्या परिसरात चांगला पाऊस झाला असून, विशेषत: पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला आहे. सध्याचे वातावरण पुढील 3 ते 4 दिवस कायम राहणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.
मुंबईत रिमझिम सरी कोसळतील, मुसळधार पावसाची शक्यता कमी
हवामान तज्ज्ञांच्या मते, सक्रिय पश्चिम वाऱ्यांचा प्रभाव म्हणजे केवळ मुंबईच नाही तर आसपासच्या भागातही चांगला पाऊस झाला. सध्याचं वातावरण पाहता मुंबईत पुढील आठवडाभर पाऊस सुरूच राहील असं चित्र दिसतंय. मात्र गेल्या 24 तासांत जे काही झालं त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे.
पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग
पश्चिम उपनगरावर पावसानं चांगलीच कृपादृष्टी केली आहे. अनेक भागांत 24 तासांत 100 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. बोरिवलीमध्ये सर्वाधिक 171 मिमी, दहिसरमध्ये 141 मिमी, मालाडमध्ये 133 मिमी, कांदिवलीमध्ये 126 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत पावसाची संततधार, मात्र तलाव अद्याप तहानलेलेच
मुंबईच्या आसपास पावसाचा जोर वाढत असतानाही मुंबईतील तलावांत मात्र अद्याप अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. तलाव परिसरात लक्षणीय पावसाची नोंद झालेली नाही. पुढील आठवड्यात तलाव परिसरातही चांगला पाऊस पडेल, त्यामुळे तलावांची पातळी वाढेल, असा अंदाज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.