(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus in Mumbai : हात जोडून सांगते, दोन मास्क वापरा; कोरोना संकटात महापौर किशोरी पेडणेकर यांची कळकळीची विनंती
मुंबईवरील संकट आणखी वाढून न देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना दोन मास्क वापरण्याची कळकळीची विनंती केली.
Coronavirus in Mumbai : मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग बऱ्याच अंशी नियंत्रणात येत असतानाही काही ठिकाणी मात्र नागरिकांचा बेजबाबदरापणा आताही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या यंत्रणेच्या कामात हाच बेजबाबदारपणा अडथळे आणत आहे. हेच चित्र पाहून मुंबईवरील संकट आणखी वाढून न देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना दोन मास्क वापरण्याची कळकळीची विनंती केली.
'मी हात जोडून विनंती करते, सर्वांनी एका वेळी दोन मास्कचा वापर करा. यासोबतच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका', अशा शब्दांत महापौरांनी सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. सोबतच नागरिकांकडून त्यांनी सहकार्याची अपेक्षाही केली. सध्याच्या घडीला कोरोना काळात एकाच मास्कचा वापर न करता एका वेळी दोन मास्कचा वापर करत नाक आणि तोंड झाकण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महापौरांनीही याचाच पुनरुच्चार केला.
I request everyone with folded hands to wear a mask, that too double masks. People are requested to not step out of their houses unnecessarily: Mumbai Mayor Kishori Pednekar#COVID19 pic.twitter.com/zyjTAPew6x
— ANI (@ANI) May 1, 2021
नव्या टप्प्यातील लसीकरणाबाबत महापौर म्हणतात...
लसीकरणाच्या नव्या टप्प्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लस देण्याची मोहित प्रशासनानं हाती घेतली आहे. त्यासंदर्भात राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं असल्याचं महापौर पेडणेकर म्हणाल्या. लसीकरणाची प्रक्रिया केंद्र सरकारच्या अख्त्यारित असल्यामुळं ज्यांनी कोविन अॅपवर नोंदणी केली आहे आणि ज्यांना मेसेज आला आहे त्यांनीच लसीकरण केंद्रावर जायचं आहे, मेसेज न दाखवल्यास लसीकरण होणार नाही असं सांगत सर्वांनीच या टप्प्यावर सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Maharashtra Vaccination | 18 ते 44 वयोगटासाठी मुंबई महापालिकेच्या 'या' 5 केंद्रांवर लसीकरण
दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून, याचीच प्रतीक्षा अनेकांना लागून राहिली होती. या टप्प्यात 18 ते 44 वर्षामधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र लसींचा पुरवठा कमी असल्याने महाराष्ट्रात मोजक्या स्वरुपात लसीकरण होणार आहे. या मोहिमेसाठी राज्याला तीन लाख डोस उपलब्ध झाले आहेत. तीन लाखांपैकी मुंबई, ठाणे आणि पुण्याला प्रत्येकी 20 हजार डोस उपलब्ध होणार आहेत. मुंबईत महापालिकेच्या पाच केंद्रांवर लसीकरण पार पडणार आहे.