एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा मोर्चाचा समारोप
आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला. तर मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं.
मुंबई : 'एक मराठा, लाख मराठा' म्हणत आज राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला. भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढून मराठा शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केलं.
क्रांतीदिनाचं औचित्य साधून राजधानी मुंबईत आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मोर्चा, दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला. आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला. तर मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या
कोपर्डीतल्या नराधमांना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये आवश्यक बदल करा, यासह अन्य मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे.
मराठा मोर्चाबाबत मुख्यमंत्र्यांचं निवेदन
"कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला अंतिम टप्प्यात असून लवकरच युक्तिवाद सुरु होईल. या प्रकरणात एका साक्षीदाराचा जबाब शिल्लक आहे. याबाबत सरकारकडून कोणताही उशिर होत नाही," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
मराठा मोर्चासंदर्भात आज विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं.
तसंच मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार असल्याचं मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले. तसंच मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल.
"छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ओबीसींप्रमाणे आता मराठा समाजासाठीही आणली जाईल. तसंच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्क्यांवर आणली. 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळेल. यापूर्वी फक्त 35 अभ्यासक्रमांसाठीच मराठा समाजाला सवलत होती. तसंच आण्णासाहेब पाटील महामंडळांचे तीन लाख तरुण स्किल ट्रेनिंग देतील. तर दहा लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करणार असून यासाठी पाच कोटी दिले जातील," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
आशिष शेलार यांना धक्काबुक्की
भाजप आमदार आशिष शेलार यांनी आझाद मैदानात येण्यास मराठा कार्यकर्त्यांकडून मज्जाव करण्यात आला. मराठा मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करुन आशिष शेलार यांना धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आपल्याला धक्काबुक्की झाली नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप आमदारांनी तिकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी केली.
शिवसेनेचं पोस्टर फाडलं
भायखळ्यातील जिजामाता उद्यानाजवळ शिवसेनेने उभारलेलं मराठा क्रांती मोर्चाचं पोस्टर फाडण्यात आलं. मोर्चात राजकारण नको म्हणून केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पोस्टर ठेवत इतर पोस्टर फाडून टाकण्यात आली. राजकारण न करण्यावर मोर्चेकरी ठाम आहेत. ‘मोर्चात यायचं असेल तर मराठा म्हणून या, नेता किंवा राजकारणी म्हणून नको, अशा सूचना मोर्चेकरी देत आहेत.
मराठा मोर्चात छत्रपती संभाजीराजेंची हजेरी
मुंबई मराठा मोर्चात कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनीही हजेरी लावली. संभाजी राजे आझाद मैदानात जाऊन सर्वसामान्य मोर्चेकऱ्यांसोबत बसले.
“मी छत्रपती म्हणून नाही, मी खासदार म्हणून नाही, मी एक सामान्य मराठा समाजाचा घटक म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहे”, असं संभाजीराजे म्हणाले.
“मोर्चे कसे असावे, हे मराठा मोर्चाने जगाला दाखवलं आहे. ज्याप्रमाणे राज्यभरात 57 मोर्चे झाले, त्याप्रमाणे मुंबईतील हा 58 वा मोर्चे असेल. हा मोर्चाही शांततेत काढावा, आपला मेसेज जगाला द्यावा, जगाला हेवा वाटेल असा हा शेवटचा मोर्चा काढावा, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी’, असं आवाहन संभाजीराजेंनी शेवटच्या मोर्चाच्या निमित्ताने केलं.
मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यावर वसुली बंद
मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरील वसुली कालपासून बंद आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने ही खबरदारी घेतली. नाशिक-मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आणि जुन्या हावेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका, अशी सगळीकडे टोलवसुली बंद आहे.
अॅम्बुलन्सने गर्दीतून अलगद वाट काढली!
अॅम्बुलन्सने गर्दीतून अलगद वाट काढली!
मराठा क्रांती मोर्चांच्या शिस्तप्रियतेचं दर्शन आज मुंबईच्या रस्त्यावरही दिसलं. जे जे फ्लायओव्हरवरुन आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर, मोर्चातल्या स्वयंसेवकांनी मागे झालेला कचरा गोळा करुन परिसराची स्वच्छता केली.
दुसरीकडे जे जे फ्लायओव्हरवरच एक अॅम्ब्युलन्स जात असताना तिला कोणताही अडथळा होणार नाही, याची काळजी मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतली. इतकंच नाही, तर मोर्चाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मराठा आंदोलकांनी रस्त्याची एक लेन पूर्णपणे रिकामी ठेवली होती. गेल्या 57 मोर्चांमध्ये दाखवलेली शिस्त आजच्या मुंबईच्या मोर्चातही ठळकपणे दिसली.
संबंधित फोटो फीचर
संभाजीराजे छत्रपती मराठा बांधवांच्या मांडीला मांडी लावून आझाद मैदानात बसले!
असा मोर्चा कधी पाहिलाय का?
संबंधित बातम्या
मोर्चेकरांचा परतीचा प्रवास सुखरुप व्हावा, ही सदिच्छा: शरद पवार
आशिष शेलार यांना धक्काबुक्की, मात्र शेलारांचा इन्कार
रितेश देशमुखचं मराठा मोर्चाबाबत मध्यरात्री हटके ट्विट!
बाळासाहेबांचं पोस्टर ठेवलं, शिवसेनेचं पोस्टर फाडलं!
मराठा मोर्चा: मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यावर वसुली बंद
पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशी
भरगर्दीतून अॅम्बुलन्स अलगद वाट काढत गेली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement