एक्स्प्लोर
तुटलेल्या रुळाला फडकं बांधून लोकल नेली, मध्य रेल्वे म्हणते..
या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली जात होती. त्यानंतर मध्य रेल्वेने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : मुंबईत तुटलेल्या रुळाला फडकं बांधून त्यावरुन लोकल ट्रेन नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. रुळाला बांधलेल्या कापडाचा वापर फक्त मार्कर म्हणून केल्याचा दावा, मध्य रेल्वेने केला आहे.
हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द आणि गोवंडी स्थानकादरम्यान काल (10 जुलै) रेल्वे रुळाला तडा गेला आणि रुळाचा तुकडा पडला. मात्र ते तातडीने दुरुस्त करण्याऐवजी तड्यावर उपाय म्हणून रुळाला चक्क फडकं बांधल्याचं समोर आलं.
धक्कादायक गोष्ट म्हणजे अशा अवस्थेत त्या रुळावर एक नाही तर तीन लोकल धावल्या. सेवा सुरु ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने, लोकलद्वारे प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या जीवाशी अक्षम्य खेळ केल्याची प्रतिक्रिया उमटू लागल्या. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली जात होती. त्यानंतर मध्य रेल्वेने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
"हार्बर मार्गावरील मानखुर्द-गोवंडी स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याची तक्रार संध्याकाळी 6.32 मिनिटांनी आमच्याकडे आली आणि अर्ध्या तासातच रुळ दुरुस्त केला होता. पण पावसामुळे रंग टिकत नसल्याने संबंधित ठिकाणी रुळाला तडे गेले हे निर्देशित करण्यासाठी ते कापड बांधलं होतं, रुळ जोडण्यासाठी नाही. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही," असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
पाणी ओसरण्यास सुरुवात, चर्चगेट-विरार वाहतूक सुरु
मुंबईसह उपनगरात गेल्या चार दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर तुंबलेलं पाणी ओसरत आहे. त्याचाच परिणाम म्हणून 24 तासांहूनही अधिक काळ बंद असणारी विरार स्टेशनवरुनची रेल्वे सेवा अखेर हळूहळू सुरु झाली आहे. आज सकाळी साडे आठच्या सुमारास विरारवरुन चर्चगेटसाठी जाणाऱ्या 5 लोकल सोडण्यात आल्या आहेत.
मात्र रुळांवर काही प्रमाणात अजूनही पाणी असल्यामुळे लोकल चक्क 10 किलोमीटर प्रतीतास या वेगानं चालवल्या जात आहेत. पाणी ओसल्यावर रेल्वे सुरळीत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
तुफान पावसामुळे नालासोपारा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला होता. परिणामी पश्चिम रेल्वेची वाहतूक चर्चगेट ते भाईंदरपर्यंतच सुरु होती. मात्र आता ती विरारपर्यंत सुरु झाली आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईकडे आणि मुंबईतून बाहेरही जाऊ शकत नाहीत.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
