एक्स्प्लोर
मुंबईत लोकल ट्रॅकजवळ तरुणीचा मृतदेह, कुटुंबाकडून अवयवदान
प्रतिभाचे हृदय, किडनी आणि लिव्हर दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. किडनी आणि लिव्हर दानामुळे दोघांना जीवदान मिळालं आहे.

फोटो सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स
मुंबई : मुंबईतील लोकल ट्रॅकशेजारी मृतदेह आढळलेल्या 19 वर्षीय तरुणीच्या कुटुंबीयांनी कठीण काळातही सामाजिक भान जपलं. आपल्या लेकीचं हृदय, किडनी आणि लिव्हर मरणोत्तर दान करुन या कुटुंबाने समाजापुढे आदर्श उदाहरण ठेवलं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. 19 वर्षीय प्रतिभा विजयचंद निशाद या तरुणीचा मृतदेह विले पारले आणि सांताक्रुझ रेल्वे स्थानकांच्या दरम्यान शनिवारी आढळला होता. 'एक मुलगी ट्रॅकवर पडल्याची माहिती आम्हाला मिळाली. तिला तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रक्तस्रावामुळे संध्याकाळी तिचा मृत्यू झाला' अशी माहिती जीआरपींनी दिली. हा अपघात कसा झाला, याबाबत रेल्वे पोलिसांचा तपास सुरु आहे. प्रतिभाचे हृदय, किडनी आणि लिव्हर दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. किडनी आणि लिव्हर दानामुळे दोघांना जीवदान मिळालं आहे. काही कारणामुळे तिच्या हृदयाचं प्रत्यारोपण करता आलेलं नाही. 'माझी बहीण परत येऊ शकणार नाही. फारच कमी वयात ती आम्हाला सोडून गेली. मात्र जेव्हा आम्हाला तिचे अवयव दान करता येतील, असं डॉक्टर म्हणाले, तेव्हा आम्ही क्षणाचाही विलंब न लावता होकार कळवला. तिला देशासाठी काहीतरी करता आलं, याचा आम्हाला आनंद आहे' अशी प्रतिक्रिया तिच्या 21 वर्षीय भावाने 'एचटी'कडे व्यक्त केली.
आणखी वाचा























