मोठी बातमी : 8 महिला पोलिसांवर 3 वरिष्ठांकडून अत्याचार, पत्रातून खळबळजनक दावा, मात्र व्हायरल पत्र फेक असल्याचा दावा
Mumbai Crime News : याबाबतचं पत्र माध्यमांमध्ये आल्यानंतर आता हे पत्र बनावट-फेक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे, याची चर्चा मुंबई पोलीस दलात सुरु आहे.
Mumbai Crime News: मुंबई : पोलीस म्हणजे, समाजात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणारं भारदस्त व्यक्तीमत्त्व. पण समाजाचं रक्षण करणारे पोलीस जर भक्षक बनले तर? मुंबईतील एका घटनेनं असा प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडलं आहे. मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेकदा बलात्कार करण्यात आला. एवढंच नाहीतर महिला पोलीस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करुन त्यांना गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आलं. याबाबतचं पत्र माध्यमांमध्ये आल्यानंतर आता हे पत्र बनावट-फेक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे, याची चर्चा मुंबई पोलीस दलात सुरु आहे.
व्हायरल पत्रात नेमकं काय?
मुंबईतील मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अत्याचार झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाल. मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातील पीडित महिला आणि आरोपी अधिकारी असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांपासून वारंवार बलात्कार झाल्याचा दावा या पत्रात केला आहे. एवढंच नाहीतर या महिला पोलीस कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीनं गर्भपात करण्यास देखील भाग पाडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ देखील या अधिकाऱ्यांनी बनवल्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे, असा उल्लेख या पत्रात आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करणारं पत्र पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे. तसेच, पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
पत्र बनावट असल्याचा दावा
दरम्यान, जे पत्र माध्यमांमध्ये आलं आहे, ते पत्र बनावट असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही, जी घटना माध्यमांमध्ये आली आहे, ती चुकीची आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या