(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime News: घरदार नसलेल्या तरुणाच्या नादी लागली अन् जीव गमावून बसली, मानखुर्दमधील तरुणीच्या हत्येमुळे संतप्त वातावरण
Mumbai Crime News: तरुणीचे इतरासोबत संबंध असल्याचा संशय घेत निजामुद्दीन याने तिची हत्या केली. कल्याण खडवली येथे हत्या करून रात्रीच्या अंधारात उरण येथील चिरणेर भागात मृतदेह टाकला होता.
मुंबई : मानखुर्दमध्ये (Mankhurd) राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह उरणमधील चिरनेर ते खारपाडा रोड लगत दोन दिवसापूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा (Mumbai Crime News) लावण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. मृत महिलेचे इतरांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सी चालकाने तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत महिलेची हत्या करणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून अटक केली आहे. उरण झुडपामध्ये एका अज्ञात महिलेचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. मृत महिलेचे नागपाडा येथे राहणाऱ्या निजामुद्दीन अली या टॅक्सी चालकासोबत प्रेमसंबंध होते. तसेच इतरासोबत संबंध असल्याचा संशय घेत निजामुद्दीन याने तिची हत्या केली. कल्याण खडवली येथे हत्या करून रात्रीच्या अंधारात उरण येथील चिरणेर भागात मृत्यदेह टाकला होता.
मानखुर्दच्या साठे नगरमध्ये पीडित तरुणी तिच्या कुटुंबासह राहत होती. नागपाडा, सँडहर्स्ट रोड येथे ती घरकाम करण्यास जात असे. शेअर टॅक्सीने ती प्रवास करत असे.यातून शेअर टॅक्सीचालक निजामुद्दीन रसिक अली याच्याशी तिची ओळख वाढली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. गेली चार वर्ष प्रेमसंबंध होते. मूळचा उत्तर प्रदेशच्या लखनौचा रहिवासी असलेल्या निजामुद्दीनचे लग्न झालेले होते. त्याला दोन वर्षाचा मुलगा आहे. मात्र तो मुंबईत भाड्याने टॅक्सी चालवून जेजे रुग्णालयाच्या आजूबाजूला पदपथावर अथवा टॅक्सीतच राहत असे. मात्र गेले चार वर्ष तो मृत तरुणीला टॅक्सीमधून सोडत असे. 18 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे कामाला गेली. त्यानंतर निजामुद्दीन हा फिरायला म्हणून कल्याणजवळील खडवली येथे घेऊन गेला होता. मात्र त्या वेळी तरुणीला आलेल्या काही फोनवरून निजामुद्दीन याने संताप व्यक्त करत तिला मारहाण केली आणि तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह उरण येथे तलाखर चिरनेर येथे रस्त्याच्या कडेला दहा बारा फूट खोल खड्ड्यात एक गोणी आणि चादरीत मृतदेह गुंडाळून फेकून दिला.
कसा झाला उलगडा?
मुंबई पोलीस शोध घेत असताना त्यांना तांत्रिक तपासावरून ती निजामुद्दीन याच्याशी त्या दरम्यान वारंवार बोलली असल्याचे समजले होते. पोलिसांनी निजामुद्दीनकडे चौकशी सुरु केली. तरुणीचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. उरण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. या वेळी त्यांनी मुंबई पोलिसांना मयत तरुणीचे फोटो पाठवले असता मानखुर्द पोलीस ठाण्यात हरवलेली दाखल असलेली तरुणीच्या माहितीशी ते जुळले. उरण पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबियांशी संपूर्ण साधून मृतदेहाची ओळख पटवली आणि मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. उरण पोलीस या हत्येचा तपास करीत असताना मानखुर्द पोलिसांनी संशयित असलेल्या निजामुद्दीनला उरण पोलिसांच्या ताब्यात दिले. उरण पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. मात्र या प्रकरणी आता वातावरण तापू लागले आहे. मयत तरुणीच्या कुटुंबीयांची नेत्यांनी भेट घेतली. किरीट सोमय्या आणि मंगलप्रभात लोढा यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली असून हे लव्ह जिहाद असायचा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :