Mumbai : गिरगावकरांना पुण्याची एसटी पकडायला वाशीला पाठवू नका, हायकोर्टाने BMC ला झापलं
Mumbai-Pune ST Stand : मुंबई पालिकेने दादरचं मुंबई-पुणे एसटी स्टॅण्ड बंद करण्याची नोटीस एसटी महामंडळाला धाडली, यावरुन हायकोर्टाने पालिकेवर संताप व्यक्त केला.
Mumbai : दादर ब्रीजखालील मुंबई-पुणे एसटी स्टॅण्ड (Mumbai-Pune ST Stand) बंद करण्याची नोटीस महापालिकेनं (BMC) एसटी महामंडळाला धाडली आहे, यावरुन हायकोर्टाने पालिकेला चांगलेच खडेबोल सुनावलेत. गिरगावातील लोकांना पुण्याची एसटी पकडण्यासाठी वाशीला पाठवू नका, असं म्हणत हायकोर्याने मुंबई पालिकेला झापलं. पालिकेने मुंबई-पुणे स्टॅण्डसाठी जवळपासच पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना हायकोर्टाने दिली आहे.
'राज्य शासन आणि पालिकेनं एकत्र बसून तोडगा काढावा'
न्यायमूर्ती के. आर. श्रीराम व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. मुळात असे मुद्दे न्यायालयात यायलाच नकोत, प्रशासनानं ते सामोपचारानं सोडवायला हवेत. दादर ब्रीज खालील स्टॅण्ड बंद करायचा असेल तर या मुद्द्यावर राज्य शासन आणि पालिकेनं एकत्र बसून तोडगा काढावा, असे निर्देश खंडपीठानं दिलेत.
टॅक्सीसह अन्य वाहनांचा त्रास नाही का?
मुंबईत ठिकठिकाणी अवैध पार्किंग केली जाते, मग फक्त एसटीलाच का धमकावताय? टॅक्सीसह अन्य वाहनांना का नाही दराडवत, असा सवालही हायकोर्टानं पालिकेला विचारला. अनेक ठिकाणी बेकायदा इमारती उभ्या राहतात, त्याची तुम्हाला अडचण होत नाही. रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई-पुणे बसेस दादरच्या ब्रिजखाली उभ्या केल्या जातात. तर एसटीची पार्किंग तुम्हाला का खूपते? या शब्दांत हायकोर्टानं पालिकेला सुनावलं.
ब्रीजखाली आम्ही पार्किंग करत नाही - एसटी याचिकाकर्ते
मुंबईत ब्रीखालील पार्किंग धोकादायक असल्यानं ती काढून टाकावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाली होती. त्याची दखल घेत हायकोर्टानं मुंबईतील सर्व ब्रीजखालील पार्किंग बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र आम्ही दादरच्या ब्रिजखाली पार्किंग करत नाही, अगदी थोड्याच वेळ्यासाठी महामंडळाच्या बसेस तिथं उभ्या राहतात, असा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
एसटी महामंडळाने अॅड. अर्पणा कलाथील यांच्या मार्फत यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दादर स्टॅण्ड हा मुंबईच्या मध्यभागी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानकं दादरला जोडतात, त्यामुळे दादर येथून मुंबई-पुणे बस सेवा सुरु करण्यात आली. इथल्या उड्डाणपुलाचं बांधकाम झाल्यानंतर त्याखालील जागा या स्टॅण्डसाठी देण्यात आली होती. ब्रीजखालील पार्किंग काढण्याचे आदेश यापूर्वीच न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामंडळानं दादर पुलाखालील स्टॅण्ड बंद करावा, अशी नोटीस पालिकेनं महामंडळाला दिली आहे. ही नोटीस रद्द करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
हेही वाचा: