(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनामुळे इमर्जन्सी पॅरोलवर गेलेल्या 892 कैद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश
आपत्कालीन कोविड पॅरोल संपल्यानंतर कैदी परत तुरुंगात आले नाही. ते सध्या कुठे आहेत याची कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे
मुंबई : कोरोनाच्या काळात देशभरातल्या अनेक तुरुंगातील कैद्यांची चांदी झाली होती. कोरोनामुळे तुरुंगात गर्दी होऊ नये आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. आता पॅरोलवर सोडलेल्या कैद्यांचा कोणताही माग लागत नाही. याची गंभीर दखल मुंबई शहर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतली आहे. पोलिसांच्या रडारच्या बाहेर गेलेल्या या कैद्यांचा शोध घेण्याचे निर्देश त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.
आपत्कालीन कोविड पॅरोल संपल्यानंतर कैदी परत तुरुंगात आले नाही. ते सध्या कुठे आहेत याची कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना रडारच्या बाहेर गेलेल्या अंदाजे 862 कैद्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. मुंबई आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे. त्यात फणसळकर यांनी सर्व विभागीय पोलिस उपायुक्त आणि सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कारागृहात परत न गेलेल्या कैद्यांचा अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. तसेच शोध घेऊन त्यांना पुन्हा कारागृहात आणण्यासाठीची विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
- महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत लादलेले सर्व निर्बंध मागे घेतल्यानंतर, राज्याच्या गृह विभागाने 4 मे रोजी सर्व दोषी कैद्यांना कारागृहात परत येण्याचे निर्देश देऊन तात्पुरत्या पॅरोलबाबत आदेश जारी केला.
- जे लोक परत आले नाहीत त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 224 (कायदेशीर कोठडीला विरोध करणे) अंतर्गत खटले नोंदवण्याचे निर्देशही गृह विभागाने तुरुंग विभागाला दिले आहेत.
या आदेशानंतर कारागृह विभागाने तातडीच्या पॅरोलचा लाभ घेतलेल्या सर्व कैद्यांच्या पॅरोल स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. 3,340 कैदी निर्धारित वेळेत कारागृहात परतले आणि जे परत येऊ शकले नाहीत, त्यांना संबंधित पोलीस ठाण्याला कळविण्यात आले.यामुळे राज्याच्या तुरुंग विभागाने या कैद्यांवर नवीन गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केली आणि आतापर्यंत 86 फरार कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे.