कोस्टल रोडचं काम सुसाट; गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दुसऱ्या बोगद्याचंही काम पूर्ण
Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी) ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं खनन काम पूर्म झालं आहे.
Mumbai Coastal Road: मुंबईचा (Mumbai News) महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड. या रोडच्या कामाला आता चांगलाच वेग आला आणि त्याचाच भाग असलेल्या स्वराज्य भूमी म्हणजे गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं खनन काम पूर्ण झालं आहे. त्याचा ब्रेक थ्रू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत काल (30 मे) पार पडलं. भारतातील सर्वात मोठ्या 'मावळा' या टीबीएम संयंत्रानं बोगद्याच्या खननाचं काम पूर्ण केलं. दरम्यान, नोव्हेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोडचा पहिला टप्पा मरीन ड्राईव्ह ते वरळी काम पूर्ण करत सुरु करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी) ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं खनन काम पूर्म झालं आहे. लवकरच हा मार्ग खुला होणार आहे. काल दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या उपस्थिती ब्रेक थ्रू पार पडलं.
कुठून कुठपर्यंत असणार कोस्टल रोड?
मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.
सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यातील दोन बोगद्यापैकी एका बोगद्याचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या बोगदाचे काम 91 टक्के पूर्ण झालं आहे.
कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. जिथे 1600 वाहने पार्क केले जातील. संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यकरण आणि इतर प्रस्तावित छोटे-मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे.
Coastal Road : कसा असणार मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?
मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड आहे.
दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीला असून प्रकल्पाचा 70 टक्के काम पूर्ण झालंय
प्रिन्सेस ट्रीप फ्लावर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असेल
एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे
यामध्ये 15.66 किमी चे तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत आणि 34 टक्के इंधन बचत होईल. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होईल
महत्त्वाच्या इतर बातम्या :